भाजी-फळे विक्रेत्यांकडून शहराचे विद्रुपीकरण
बेळगाव : एकीकडे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र भाजीविक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने ओला कचरा जिकडे तिकडे टाकला जात आहे. विशेष करून मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या दुभाजकावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ व सुंदर बेळगाव बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्याची वेळेत उचल व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरणही करण्यात येत आहे. बेळगावातील कचऱ्याची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात असतानाच भाजीविक्रेत्यांकडून मात्र असहकार्य मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कचऱ्याची उचल करण्यासाठी दररोज शहरात सफाई कामगार वाहनाद्वारे फेरफटका मारतात. त्याचबरोबर कचरा टाकण्यासाठी विविध ठिकाणी कचराकुंड्या देखील ठेवण्यात आल्या आहेत. पण त्यामध्ये कचरा टाकण्याऐवजी भाजीविक्रेते मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील दुभाजकावर ओला कचरा टाकत आहेत. ओला कचरा पोत्यामध्ये भरून दुभाजकावर टाकण्यात आला असल्याने मिनी कचरा डेपो तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांच्या या मनमानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वच्छ रस्ता होतोय अस्वच्छ
सकाळी नागरिक लवकर उठून आपल्या घरासमोरील अंगण व रस्ता कचरामुक्त करतात. त्यानंतर पाणी मारून रांगोळीही काढतात. मात्र, नंतर कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तो पिशवीत भरताना परत रस्त्यावरच सांडला जात आहे. त्यामुळे स्वच्छताप्रिय नागरिकांना पुन्हा झाडू मारावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.









