कुर्डुवाडी प्रतिनिधी
एस टी बस चालकाला गाडी चालवत असताना अचानक फिट्समुळे चक्कर आली आणि बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला काळ्या रानात पलटी झाली. सुमारे तीस प्रवासी जखमी झाले असून सर्वांना कुर्डुवाडी येथील प्राथमिक रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला व एक पुरुषाला फॅक्चर व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापुर येथे पाठविण्यात आले आहे. सदर बस मध्ये ५५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना शुक्रवार दि.१९ रोजी कुर्डुवाडी – टेंभुर्णी रस्त्यावरील पिंपळनेर येथील मंगल कार्याजवळ सकाळी १० वा. सुमारास घडली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कुर्डुवाडी आगारातील वैराग – पुणे स्वारगेट(एसटी बस क्र. एम एच १४ बी टी ०९७२ ) ही पुण्याकडे निघाली असता कुर्डुवाडी बसस्थानकात थांबून सदर बस पुण्याकडे निघाली असता ९ .५० वा.सुमारास पिंपळनेर हद्दीत बस चालकाला अचानक फिट्स आली त्यामुळे चालकाचे एस टी बस वरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला काळ्या मातीत पलटी झाली. यावेळी वाहकाने प्रसंगावधान गाडीची चावी काढली असल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवास्याने सांगितले.यामध्ये चालक व वाहक किरकोळ जखमी झाले असून कुर्डुवाडी, पिंपळनेर येथील चार रुग्णवाहिकेद्वारा तात्काळ कुर्डुवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी संदीप चौधरी, प्रवीण ढेकळे, विशाल मोरे,ज्योतीराम वाघमारे ,सुरज अस्वरे यांनी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर रूग्णांना रुग्णवाहिकेतून रूग्णालयात नेण्यास मदत केली.