माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या प्रयत्नाला यश
बेळगाव : परिवहन विभागाने अखेर सोमवारपासून अनगोळ लक्ष्मी मंदिर गांधी स्मारक इथपर्यंत ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी लक्ष्मी मंदिर गांधी स्मारक येथे बस पोहचताच माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी तसेच महिलावर्गानी बसचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी, राजू पवार, भाऊ कावळे, अजित पाटील यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. यावेळी बस चालक व वाहक विभागीय कंट्रोलर मडिवाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक हणमण्णावर, चंद्रकांत होनगेकर, भाऊ कावळे, राजू पवारे, अजित पाटील, विश्वनाथ पवार, विघ्नेश गुंजटकर, जोतिबा यळ्ळूरकर तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनगोळ बससेवा शेवटच्या बस थांब्यापर्यंत सुरू झाल्याने नागरिकांनी तसेच विद्यार्थी व महिलांनी समाधान व्यक्त केले. अनगोळची बससेवा हा एक चर्चेचा विषय ठरला होता. गेल्या दोन वर्षांपासून अनगोळची बस वाहतूक शेवटच्या स्थानकाला पोहचत नव्हती आणि यासाठी अनगोळच्या ग्रामस्थांनी परिवहन विभागाला आंदोलने, निवेदने देऊन याबाबत आवाजही उठविला होता.
पण प्रत्येकवेळी एक दोन दिवस बस वाहतूक सुरू करून पुन्हा बंद करण्यात येत असे. चार दिवसापूर्वी पुन्हा माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तसेच वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधून स्वत: अनगोळला भेट देऊन बसमध्ये बसून अनगोळच्या वाहतूक मार्गावरून फेरफटका मारला आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनगोळ मुख्य रोड, धर्मवीर संभाजी चौक वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ मार्गे लक्ष्मी मंदिर तिथून परत लक्ष्मी मंदिर, रघुनाथ पेठ, धर्मवीर संभाजी चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारुन पाहणी केली. अनगोळची बससेवा ही पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने जोर धरू लागली होती. कारण अनगोळ बस वाहतूक ही मराठी शाळा इथपर्यंतच सुरू ठेवण्यात आली होती. अनगोळ मारूती गल्ली, लोहार गल्ली, झेरे गल्ली,कोनवाळ आदी भागातून बस पकडण्यासाठी एक दीड किलोमीटर अंतरावरून चालत जावे लागत असे आणि खासकऊन विद्यार्थी आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असे.
बससेवेसाठी ‘तरुण भारत’मधून पाठपुरावा
अनगोळची बससेवा ही लक्ष्मी मंदिर, महात्मा गांधी स्मारक इथंपर्यंत सुरळीत सुरू करावी, यासाठी अनगोळ येथील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग तसेच माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी वेळोवेळी आवाज उठविला. परिवहन विभाग, मनपा आयुक्तापासून पोलीस अधिकाऱ्यापर्यंत निवेदने देण्यात आली होती. नागरिक, विद्यार्थी व महिलांचे होणारे त्रास कमी करण्यासाठी आणि बससेवा ही शेवटच्या स्थानकापर्यंत सुरळीत सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले. तसेच तरुण भारत वृत्तपत्रातूनही या समस्येवर वारंवार आवाज उठविण्यात आला होता.









