20 हून अधिक प्रवासी जखमी
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूतील अरनिया येथे मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चालकाने नियंत्रण गमाविल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुघटनेत 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक बस भरधाव वेगाने चालवत असल्याने ही दुर्घटना झाल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात आले.
बस दरीत कोसळताच जखमी प्रवाशांची चित्कार ऐकून आसपासच्या लोकांनी तेथे धाव घेतली. बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढत लोकांनी स्वत:च्या वाहनांद्वारे त्यांना रुग्णालयात हलविले आहे. काही प्रवाशांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी दुर्घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचले. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी आता अरनिया पोलीस तपास करत आहेत.









