राष्ट्रीय महामार्गावर हंचिनाळ क्रॉसनजीकची घटना : प्रसंगावधान राखल्याने प्रवासी बचावले
प्रतिनिधी / संकेश्वर
धावत्या बसला ओव्हरहिटमुळे आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. सदर घटना गुऊवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर हंचिनाळ क्रॉसपासून जवळच असणाऱ्या गुलाबशहा दर्गाहनजीक घडली. सुदैवाने प्रवाशांनी वेळेत उतरत बस रिकामी केल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, संकेश्वर आगाराची केए 23 एफ 950 ही बस गुऊवारी साताऱ्याहून बेळगावच्या दिशेने जात होती. यावेळी बस महामार्गावरील गुलाबशहा दर्गाहनजीक आली असता अचानक बसमधून धूर आणि त्यापाठोपाठ आगीचे लोळ उठले. यानंतर तात्काळ चालकाने सावधगिरीने बस रस्त्याकडेला थांबवत प्रवाशांना उतरवले. तितक्मयात अचानक संपूर्ण बसने पेट घेतला.
सदर घटनेची माहिती मिळताच संकेश्वर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सदर घटनेत बसचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी
नियंत्रणाधिकाऱ्यांची भेट
चिकोडीहून बेळगावच्या दिशेने जात असलेले चिकोडी विभागाचे नियंत्रण अधिकारी मरिदेवरमठ शशिधर यांना सदर आग लागलेली बस दिसताच त्यांनी तात्काळ आगारप्रमुख वीणा डांगे यांना संपर्क साधत सूचना केल्या. त्यानुसार डांगे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने सदर घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणी चालक आणि वाहकाची चौकशी करून दोघांवरही कारवाई करणार असल्याची माहिती आगारप्रमुख वीणा डांगे यांनी दिली.
निष्काळजीपणा…
सदर बस सकाळी 6.30 वाजता साताऱ्याहून निघाली होती. यानंतर 10.30 वाजेपर्यंत संकेश्वर आगारात बस पोहोचणे अपेक्षित असताना दुपारी 3.50 वाजता संकेश्वरात पोहोचली. ओव्हरहिटमुळे बस अत्यंत संथगतीने पोहोचली. बस ओव्हरहीट होत असल्याची माहिती चालक जी. एस. हुगार आणि वाहक श्रीधर विठ्ठल पावले यांनी निपाणी अथवा संकेश्वर आगारात देणे आवश्यक होते. मात्र ही माहिती न देताच बेळगावच्या दिशेने मार्गस्थ केली.









