भाविकांचे भारे उघड्यावर टाकून देण्याची वेळ : शिरगांव श्री लईराई देवस्थानासमोरील अडचण
पणजी : शिरगांव येथील देवी श्री लईराईच्या जत्रोत्सवादिनी भाविकांकडून नवस बोलून होमकुंडात अर्पण करण्यात येणारे लाकडांचे भारे (मौळी) हाताळणे देवस्थान व्यवस्थापनाला डोईजड होऊ लागले आहे. एकतर हे भारे प्रत्यक्षात होमकुंडात वापरता येत नसल्यामुळे त्यांची विल्हेवाट कशी लावावी असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा तर असे किमान चार ट्रक भरतील एवढे भारे सध्या उघड्यावरच टाकून देण्यात आले आहेत, यावरून या समस्येचे गांभीर्य लक्षात येत आहे.
देवी लईराईच्या जत्रोत्सवात दरवर्षी अनेक भाविक एखादी मनिषा ठेऊन नवस बोलतात. कार्यसिद्धी झाल्यानंतर होमकुंडात लाकडांचे भारे अर्पण करून नवस फेडण्यात येतो. नवस पूर्तीसाठी भाविक स्वत: भारे घेऊन येतात व सदर भारा डोक्यावर ठेऊन ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, असा अखंड नामघोष करत होमकुंडास इच्छाशक्तीनुसार पाच, अकरा, एकवीस, अशा प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर तो भारा होमकुंडात अर्पण करण्यात येतो.
अशा प्रकारे नवस बोलण्याने इच्छा फलप्राप्ती होत असल्याची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. त्यातून अनेक भाविकांमध्ये स्वत:ही नवस बोलण्याची मनिषा जागृत होते. परिणामस्वऊप हल्लीच्या वर्षांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात असे भारे आणू लागले आहेत. त्यात प्रत्येक वर्षी नवनव्या भाविकांची भर पडू लागली आहे. परंतु हे भारे प्रत्यक्ष होमकुंडात टाकता येत नसल्याने व्यवस्थापनासमोर पेच निर्माण झाला आहे.
भाऱ्यांचा होमकुंडात होत नाही वापर
यासंबंधी शिरगावातील ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, होमकुंडासाठी विशिष्ट प्रकारचीच आणि कोळसा निर्माण करणारी लाकडे हवी असतात. अशी लाकडे वर्षपद्धतीनुसार ठराविक ठिकाणाहून आणली जातात. त्या मानाने भाविकांनी आणलेल्या भाऱ्यांची लाकडे हलक्या प्रतिची असल्यामुळे त्यापासून कोळसा निर्माण होत नाही. परिणामी त्यांचा होमकुंडासाठी वापर करता येत नाही.
यासंबंधी दरवर्षी आम्ही भाविकांना भारे न आणण्याबद्दल आवाहन करत असतो. परंतु त्यांची श्रद्धा व भक्तीपुढे आमचे काहीच शहाणपण चालत नाही. लोक स्वत:च नवस बोलतात आणि तो फेडण्यासाठी भारे घेऊन येतात. त्यावरही उपाय म्हणून आम्ही, भारा अर्पण करण्यासाठी पावतीऊपी मोठ्या रकमेची आकारणी करण्याची क्लुप्ती लढविली, तरीही भाविक हवे तेवढे पैसे देण्यास तयार. त्यामुळे भारे स्वीकारण्यावाचून पर्याय राहात नाही, असे त्या व्यक्तीने पुढे सांगितले.
चार ट्रक भरतील एवढी लाकडे
अशा प्रकारे यंदा होमकुंडात मोठ्या प्रमाणात भारे अर्पण करण्यात आले होते. मात्र त्यातील एकसुद्धा लाकुड प्रत्यक्ष होमकुंडात टाकण्यात आले नाही. शेवटी ते सर्व भारे जवळच्याच माळरानावर टाकण्यात आले. हे भारे थोडे थोडके नसून किमान चार ट्रक भरतील एवढे आहेत. सदर भारे त्या जागेवर टाकण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला होता. सर्व भारे हाताळण्यासाठी त्याला तब्बल 27 फेऱ्या माराव्या लागल्या. यावरून लाकडांचे प्रमाण लक्षात यावे, असे सदर नागरिकाने सांगितले.
दरम्यान, दरवर्षीची ही समस्या कायमस्वऊपी मिटविण्यासाठी आता पुढील जत्रोत्सवापासून देवस्थानतर्फेच ठराविक संख्येने भाऱ्यांची व्यवस्था करण्याची कल्पना पुढे आली आहे. त्यामुळे नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकाला स्वत: लाकडे आणण्याची गरज भासणार नाही. होमकुंडाच्या ठिकाणी आल्यानंतर त्याने प्रथम पावती फेडायची आणि एखाद्या भाऱ्यास स्पर्श करायचा. त्यानंतर तेथील घाडी त्याचा नवस पावन झाल्याबद्दल देवीस सांगणे करेल.
नवस पावन झाल्याचे भाविकाला लाभेल समाधान
अशाप्रकारे नवस फेडलेले भारे नंतर प्रत्यक्षात होमकुंडात अर्पण करण्यात येतील. त्यामुळे आपली भेट सार्थकी लागल्याचे समाधानही त्या भाविकास लाभेल, अशी एकूण कल्पना/योजना असल्याचे सदर नागरिकाने सांगितले. मात्र सध्यातरी हा केवळ एक विचार आहे. अद्याप त्याला मूर्तरूप देण्यात आलेले नाही. त्यासंदर्भात मंदिर समिती आणि महाजनांचाही विचार घ्यावा लागणार आहे. त्यातून सर्वांचे एकमत झाले तरच तो मार्गी लागेल/सत्यात उतऊ शकेल, असा विचार सदर नागरिकाने बोलून दाखवला.









