वजन कमी करण्याच्या शिक्षण खात्याच्या सर्व शाळांना सूचना
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोवळ्या वयातच त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. याचा विचार करून शिक्षण विभागाने वर्गवारीनुसार दप्तराचे वजन निश्चित केले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या 10 टक्के दप्तराचे वजन असणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने हा नवा अध्यादेश मंगळवार दि. 20 जूनला प्रत्येक शाळेला पाठविला असून दफ्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. विषय तितकेच असले तरी अतिरिक्त पुस्तकांचा बोजा विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादला जात आहे. बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरापर्यंत कसाबसा हा बोजा पाठीवरून वाहून आणतात. बसमध्ये चढताना आणि उतरतानाही मोठे दप्तर विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच पाठीच्या मणक्याचे आजार जडू लागले आहेत. त्यामुळे काही पालकांनी दप्तराच्या वाढत्या वजनाविषयी शिक्षण खात्याकडून तक्रार केली होती. अस्थिरोगतज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार विद्यार्थ्याच्या एकूण वजनाच्या 10 टक्के वजन दप्तराचे असावे, अशा सूचना केल्या. शिक्षण विभागाने पहिली ते दहावी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन निश्चित केले आहे. तसेच सर्व शाळांना सूचना करण्यात आल्या असून अतिरिक्त पुस्तकांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादू नये, असे सांगण्यात आले आहे.
वर्ग दप्तराचे निर्धारित वजन
- पहिली ते दुसरी 1.5 ते 2 किलो
- तिसरी ते पाचवी 2 ते 3 किलो
- सहावी ते आठवी 3 ते 4 किलो
- नववी ते दहावी 4 ते 5 किलो









