सेन्सेक्स 232 अंकांनी वधारला : महिंद्राचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारात दबावाचे वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजार मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. आयटी, टेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील समभागांनी बाजाराला चांगला आधार दिल्याचे पहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 232 अंकांच्या वाढीसह 65,953 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 80 अंकांच्या वाढीसह 19,597 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी निर्देशांकात डिव्हीज लॅब्जचा समभाग सर्वाधिक 4.51 टक्के इतका वधारला होता. याप्रमाणेच महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग 4.33 टक्के वाढत बंद झाले होते. दुसरीकडे ब्रिटानियाचे समभाग मात्र 2.68 टक्के इतके घसरणीत राहिले होते.
सेन्सेक्स निर्देशांकात पाहता महिंद्रा आणि महिंद्रा सर्वाधिक तेजीत होता. तर यासोबत सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि इन्फोसिसचे समभाग 1 टक्का इतक्या तेजीसमवेत बंद झाले. हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, लार्सन टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, टायटन आणि इंडसइंड बँकचे समभागही तेजीसोबत बंद झाले. दुसऱ्या बाजुला एसबीआय, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले.
हेल्थकेअर आणि आयटी निर्देशांक प्रत्येकी 1 टक्का वाढीसह बंद झाले तर रियल्टी निर्देशांक 0.50 टक्के तेजीसह बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.50 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.25 टक्के तेजीसमवेत बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैसे मजबुत होऊन 82.74 वर बंद झाला. याआधीच्या सत्रात रुपया 82.84 स्तरावर बंद झाला होता.
जागतिक बाजारात घसरण
जागतिक बाजारांमध्ये पाहता अमेरिकेतील आणि युरोपातील बाजार घसरणीत होते. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 150 अंकांनी आणि नॅसडॅक 50 अंकांनी घसरणीत होता. आशियाई बाजारात मात्र मिश्र कल पाहायला मिळाला. निक्की, स्ट्रेटस् टाइम्स, सेट कम्पोझीट यांचे निर्देशांक तेजीत तर हँगसेंग, कोस्पी, शांघाई कम्पोझीट निर्देशांक घसरणीसह कार्यरत होते.









