सेन्सेक्स 899 अंकांनी तेजीत : आयटी कंपन्या नफ्यात
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा फायदा उठवत भारतीय शेअरबाजाराने गुरुवारीही तेजी कायम ठेवण्यात यश मिळवलं. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांची कामगिरी मोलाची ठरली. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 899 अंकांच्या वाढीसह 76348 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे तेजीवर स्वार असणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही 283 अंकांनी वाढत 23191 अंकांवर बंद होण्यात समाधान मानले. अमेरिकेकडून कर लादण्याच्या चिंतेच्या वातावरणात भारतीय शेअरबाजार मात्र गुरुवारी सकारात्मक राहिला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचे धोरण जाहीर केले आहे. याचाही सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मूल्य 3.32 लाख कोटींनी वाढत 408.32 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते.
फेडरल रिझर्व्हने रेट कट केलेला नाही पण अमेरिकेतील आर्थिक विकासाची गती मंद राहणार असल्याचे संकेत मात्र दिलेले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक 2025 मध्ये 16 टक्क्यापर्यंत घसरला होता, पण आज यात 1.2 टक्के इतकी वाढ दिसून आली. आयटी कंपन्यांच्या समभागांची खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला. एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस, विप्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग गुरुवारी 2 टक्के इतके वाढले होते. सेन्सेक्सच्या वाढीत आयटी समभागांनी 200 अंकांचे योगदान दिलेले दिसून आले. एनएसईवर सर्व 19 क्षेत्रांचे निर्देशांक तेजी दाखवत बंद झाले आहेत. ऑटो निर्देशांक 1.41 टक्के तेजीत तर एफएमसीजी, मीडिया, रियल्टी आणि धातु निर्देशांक 1 टक्कापेक्षा अधिक तेजीत राहिले होते. बँकिंग निर्देशांकही 0.72 टक्के इतका वाढला होता. भारती एअरटेल, आयशर मोटर्स आणि टायटन यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते









