इन्फोसिसचे समभाग 4 टक्क्यांनी मजबूत : सेन्सेन्क्सची झेप 205 अंकांवर स्थिरावली
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील नवीन आठवड्याची सुरुवात सकारात्मक झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने जागतिक पातळीवरील अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढीमधील नरमाई व विविध कंपन्यांकडून सादर करण्यात येणाऱ्या तिमाही अहवालामधील आकडेवारीचा प्रभाव हा भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर झाला असल्याचे मंगळवारच्या सत्रात पहावयास मिळाले. दिवसभरातील कामगिरीमध्ये सेन्सेक्स 205.21 अंकांनी मजबूत होत बंद झाला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 205.21 अंकांनी वधारुन म्हणजेच 0.31 टक्क्यांच्या तेजीसोबत निर्देशांक 66, 795.14 वर बंद झाला असून दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 37.80 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 19,749.25 वर बंद झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात विविध कंपन्यांमध्ये इन्फोसिसचे समभाग हे सर्वाधिक 3.73 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच एशियन पेन्ट्सचे समभाग 1.56 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. यावेळी एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, विप्रो, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयटीसी आणि टीसीएस यांचे समभाग हे वधारले आहेत.
‘या’ समभागाची घसरण
सेन्सेक्समधील स्टेट बँकेचे समभाग हे सर्वाधिक 1.45 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. यासह टायटन , बजाज फायनान्स, टाटा मोर्ट्स, सनफार्मा, अल्ट्राटेक सिमेंट , टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांमधील स्थिती पाहिल्यास यामध्ये धातू आणि रियल इस्टेट यांचे निर्देशांक एक- एक टक्क्यांनी घसरले आहेत. तर ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक हा 0.6 टक्क्यांनी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हेही उसळी घेत बंद झाले आहे.
तज्ञांच्या नजरेतून……..
चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मंगळवारी विदेशी गंतवणूकदारांनी गुंतवणूक कायम ठेवल्याने बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये लिलाव राहिला होता. यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांच्या कामगिरीने विक्रमी तेजीचा प्रवास सुरु ठेवला असल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले आहे. यामध्ये अमेरिकन बाजारातील सोमवारच्या सत्रामधील सकारात्मक स्थितीचाही लाभ भारतीय बाजाराला झाला असल्याचे यावेळी तज्ञांनी नमूद केले आहे.









