सेन्सेक्स 169 अंकांनी तर निफ्टी 44 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 169 तर निफ्टी 44 अंकांनी वधारुन बंद झाले आहेत. प्रमुख समभागांपैकी बुधवारी 30 समभागांमधील 21 तेजीत र 9 मध्ये घसरणीचा कल राहिला आहे. सध्या नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमधील कंपन्यांचे नफा कमाईचे आकडे विविध कंपन्यांकडून सादर करण्यात येत आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून गुंतवणूकदारांमधील सकारात्मकता ही भारतीय बाजारातील तेजी कायम ठेवत असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे. यामुळे या कामगिरीचा आगामी काळातही बाजाराला फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 169.87 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,300.58 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 44.35 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,813.60 वर बंद झाला आहे. बुधवारच्या सत्रात रियल्टी क्षेत्र हे 1.36 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच चढ-उतारामध्ये बँक निफ्टी 0.35 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला, वाहन क्षेत्र 0.53 तेजीत तर धातूमध्ये 0.44 टक्क्यांनी विक्री झाली आहे.
मारुती नफा कमाईत
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने मार्च 2023 मध्ये समाप्त झालेल्या तिमाही अहवालात मारुती सुझुकीला निव्वळ नफा 43 टक्क्यांनी होत तो वाढून 2,624 कोटी रुपयावर पोहोचला आहे. यामुळे याचा फायदाही गुंतवणूकदारांना बुधवारी झाला आहे.
गुंतवणूकदारांना अपेक्षा
भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूकदारांना सकारात्मक स्थिती दिसून येत असून आगामी काळातही ही स्थिती आणखीन सुधारणा असल्याचे संकेत अभ्यासक व्यक्त करत आहेत. यामुळे तिमाही अहवाल, तसेच मान्सून सकरात्मक होण्याच्या बातम्यामुळेही शेअर बाजारातील कामगिरीला लाभ होणार असल्याचे भाकीत केले जात आहे. आता हे किती प्रमाणात भाकीत खरे होणार आहे हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.









