सेन्सेक्स 309 तर निफ्टी 108.65 अंकांनी मजबूत : पीएसयू बँकांचे समभाग वधारले
मुंबई :
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात भारतीय भांडवली बाजारातील बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. दरम्यान बुधवारी आशियाई बाजारांमध्ये घसरणीचा कल राहिला. पण देशांतर्गत शेअर बाजार मात्र वधारत बंद झाले. यासह, सलग दुसऱ्या व्यापार सत्रात बाजाराने वाढ नोंदवली आहे. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 आणि सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. तथापि, बँकिंग समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे व्यापाराच्या दुसऱ्या सहामाहीत निर्देशांक तेजीसोबत परतला आहे.
बीएसई सेन्सेक्स 200 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह उघडला. मात्र अंतिम क्षणी सेन्सेक्स 309.40 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 0.40 टक्क्यांनी वधारुन 77,044.29 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा काहीशा वाढीसह खुला झाला. परंतु अखेर 108.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 23,437.20 वर बंद झाला.
या क्षेत्रांची चमक
विविध क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये वाहन, धातू, औषध आणि आरोग्यसेवा वगळता निफ्टी 2.37 टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक (निफ्टी पीएसयू बँक) मध्ये सर्वाधिक वाढ राहिली आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग तेजीत राहिले. यामध्ये इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स आणि भारती एअरटेल हे सर्वाधिक तेजीत राहिले होते.
3 ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 4 टक्क्यांनी मजबूत
गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये बेंचमार्क निर्देशांक 4 टक्क्यापेक्षा जास्त वाढला. यामुळे सेन्सेक्सला या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास मदत झाली, जे 2 एप्रिल रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्काची घोषणा केल्यामुळे झाले होते.
जागतिक बाजारात काय?
गेल्या व्यापार सत्रात वॉल स्ट्रीटवर डाऊ जोन्स 0.38 टक्क्यांनी घसरून 40,368.96 वर बंद झाला. एस अँड पी 500 0.17 टक्क्यांनी घसरून 5,396.63 वर बंद झाला. तर नॅस्डॅक कंपोझिट 0.05 टक्क्यांनी घसरून 16,823.17 वर बंद झाला. बेंचमार्कशी जोडलेले फ्युचर्स देखील कमी व्यापार करत होते. डाऊ जोन्स फ्युचर्स 0.5 टक्के, एस अँड पी 500 फ्युचर्स 0.9 टक्के आणि नॅस्डॅक 100 फ्युचर्स 1.5 टक्के घसरले. आशियाई बाजारांमध्येही आज घसरण झाली. जपानचा निक्केई निर्देशांक 0.33 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.29 टक्के खाली होता. तथापि, ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 आज 0.17 टक्क्यांनी वर होता. हाँगकाँगचा हँगसेंग 1.01 टक्के आणि चीनचा सीएसआय300 0.87 टक्के खाली होता.









