जागतिक पातळीवर संमिश्र स्थिती : सार्वजनिक बँका-रियल्टी क्षेत्रांमुळे बाजाराला बळ
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी जागतिक पातळीवरील संमिश्र स्थितीमुळे भारतीय बाजारात काहीसे चढउताराचे वातावरण राहिले होते, परंतु दिवसभरातील कामगिरीमध्ये रियल्टी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. दरम्यान आयटी क्षेत्रातील समभाग घसरणीत राहिल्याने तेजीचा प्रवास काहीसा मर्यादित राहिला.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 147.79 अंकांनी वधारुन निर्देशांक 75,449.05 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 73.30 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 22,907.60 वर बंद झाला आहे.
निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. निफ्टी एफएमसीजी आणि आयटी वगळता एनएसईवरील सर्व निर्देशांक सकारात्मक राहिले.
निफ्टी 50 मधील 50 पैकी 31 समभाग वाढीसह बंद झाले. श्रीराम फायनान्स, एचडीएफसी लाइफ, अपोलो हॉस्पिटल्स, टाटा स्टील आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे समभाग हे 3.91 टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे, टेक महिंद्रा, ब्रिटानिया, टीसीएस, इन्फोसिस आणि सन फार्मा निफ्टी 50 हजार 19 समभागांमध्ये राहिले, जे 2.32 टक्क्यांपर्यंत घसरले.
दोन महिन्यांच्या उच्चांकावर रुपया
बुधवारी भारतीय रुपया जवळजवळ दोन महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर मजबूत झाला. डॉलर विक्री आणि परदेशी बँकांकडून हंगामी गुंतवणूकीमुळे देशांतर्गत चलनाला पाठिंबा मिळाला. तर यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी प्रादेशिक समकक्षांमध्ये घसरण झाली होती. बँक ऑफ जपानने व्याजदर 0.50 टक्के वर स्थिर ठेवले आहेत बँक ऑफ जपानने त्यांच्या अलिकडच्या बैठकीत त्यांचा प्रमुख अल्पकालीन व्याजदर 0.50 टक्के वर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बाजाराच्या अपेक्षांनुसार आहे. या निर्णयामुळे व्याजदर 2008 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर राहिला आहे. मध्यवर्ती बँकेने जागतिक धोरण जोखमींवर भर दिला असल्याचे सांगितले.









