विधानपरिषदेत सत्ताधारी सदस्यांनी दिले बहुमत : पूरग्रस्तांसाठी 638 कोटी रुपयांची तरतूद
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभेमध्ये मंजूर झालेले पुरवणी अंदाज अर्थसंकल्पपत्रक विधानपरिषदमध्ये मांडण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हे अंदाजपत्रक मांडले. यामध्ये जवळपास 8 हजार 1 कोटीचे अतिरिक्त अंदाजपत्रक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये विविध विभागांसाठी करण्यात आलेली तरतूददेखील यावेळी सांगितली. त्याला विरोधी पक्षाने विरोध केला.
जलधारा योजनेसाठी 200 कोटी, शिक्षण विभागासाठी 200 कोटी, अनुसूचित जाती-जमातीसाठी, मेघा हॉस्टेलसाठी, येणाऱ्या निवडणुकीसाठी 300 कोटी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या अंदाजपत्रकामधील त्रुटी विरोधी पक्षनेते हरिप्रसाद यांनी सांगितल्या. विधानपरिषद सदस्य तिप्पेस्वामी यांनीही या अंदाजपत्रकाबाबत काही अडचणी सांगितल्या.
कोरोनामुळे मध्यंतरी सर्वत्र मंदीचे सावट पसरले होते. मात्र आता काही प्रमाणात हे सावट कमी झाले असून वाढीव अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्याला मोठा महसूल मिळणार आहे. त्यामुळेच हे वाढीव अंदाजपत्रक सरकारने तयार केले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 638 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर रेल्वे, पाणी, नरेगा, हॉस्टेल व घरे यासाठीदेखील विशेष निधीची तरतूद केली आहे. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यासाठी थेट निधी येतो. मात्र तो निधी त्या योजनांना कमी पडतो. त्यामुळे राज्य सरकारही त्यामधील काही वाटा उचलून सर्वसामान्य जनतेला संपूर्ण योजना देण्याचे काम करत आहे, असे सांगितले. या अंदाजपत्रकामुळे राज्यावरील कर्ज आणखी वाढणार, असे विरोधी पक्षनेते हरिप्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे वाढीव अंदाजपत्रक थांबवावे, असे ते म्हणाले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सर्व सदस्यांनी या अंदाजपत्रकाला संमती दर्शवून बहुमताने मंजूर करण्यात आले.









