प्रतिनिधी / विजय पाटील :
गाय, म्हैस, शेळी दूध देतात हे सर्व मान्य आहे. मात्र बोकड दूध देतो असे म्हटले तर कोणाला पटणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे एक बोकड चक्क दूध देत असून, त्याच्या अदभूत किमयेची जोरदार चर्चा होत आहे. सरवडे गावातील शिवाजी शंकर कुंभार यांचा हा पाळीव बोकड असून तो दूध देतो हे ऐकून त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
शिवाजी कुंभार हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्याचबरोबर गेले अनेक वर्ष ते शेळीपालनाचा व्यवसाय देखील जोडधंदा करतात. सध्या त्यांच्याकडे पाच शेळ्या व एक सहा महिन्याचा बोकड आहे. या बोकडा समवेत असलेल्या तीन शेळ्या गाभण देखील राहिल्या आहेत. मात्र बोकडाचे एक वेगळेपण असून, या बोकडास दोन लहान स्तने आहेत. उत्सुकते पोटी मालकाने स्तने पिळून पाहिले असता. त्यातून गेले काही दिवस अर्धी वाटी दूधही निघत आहे. नर आणि मादीची वैशिष्ट्ये असलेल्या बोकडाची खुमासदार चर्चा होत आहे. त्याच्या आश्चर्यकारक वैशिष्टयाची चर्चा गावभर पसरल्याने लोक कुतूहलापोटी पाहण्यासाठी जात आहेत.
बोकड हा नर असल्याने दूध देणे अशक्य आहे. मात्र नैसर्गिक बदलाने बोकडाच्या शरिरात हार्मोन्स वाढतात. त्यामुळे बोकड दूध देण्याची घटना घडू शकते. बोकडाने दूध देणे हा चमत्कार नसून हे केवळ शरिरातील बदलामुळे कांही काळ दूधासारखा पदार्थ निघू शकतो, असे मत पशु डॉक्टर वाय. के .पाटील यांनी व्यक्त केले.