वार्ताहर /गुंजी
इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये रिमोट कंट्रोलचा वापर करून 50 किलोच्या पोत्यामध्ये सात ते आठ किलो वजनाची काटामारी करणाऱ्या खानापूर तालुक्यातील एका दलालाच्या हस्तकाला रंगेहाथ पकडण्यात कापोलीतील शेतकऱ्यांना यश आले आहे. सदर आशयाची बातमी 15 डिसेंबरच्या ‘तरुण भारत’च्या अंकात ‘जादा दराचे आमिष दाखवून काटामारी, शेतकऱ्यांनी वेळीच सावध राहण्याची गरज’, या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे या परिसरातील शेतकरी सतर्क झाले होते. त्यामुळेच काटामारीचा हा प्रकार शेतकऱ्यांच्या सावधगिरीमुळे उघडकीस आला. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून येथील शेतकऱ्यांत खळबळ माजली आहे. कारण सदर व्यापारी दोन वर्षापासून गुंजीसह आजूबाजूच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे भात खरेदी करतो. आज कापोलीतील देसाई यांच्या शेतातील खळ्यात भाताचे वजन करताना हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. सदर व्यापारी रिमोट आपल्या लांब बाह्याच्या अंगरख्यात लपवून वजनामध्ये तफावत करत असल्याचे दृष्टीस पडताच त्या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना बोलावून त्याची झडती घेतली. सदर रिमोट कंट्रोल ताब्यात घेऊन त्याला जाब विचारला असता मालकाच्या सांगण्यावरून आपण हे करत असल्याचे त्याने कबूल केले.याविषयी येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव देसाई यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची त्यांनी पुष्टी दिली.याबाबत शनिवारी सकाळी बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितले.









