वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ग्रीसमधील अॅथेंसमध्ये झालेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व महिलांच्या कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला मल्लांनी चमकदार कामगिरी केली असून एकूण सहा पदकांची कमाई केली आहे. भारतीय कनिष्ठ महिला मल्लांनी दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदक या स्पर्धेत मिळविले. भारतीय कुस्ती फेडरेशनने या महिला मल्लांचे खास कौतुक केले आहे. अॅथेंसमधील झालेल्या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला कुस्ती संघाने 151 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत अमेरिकेने 142 गुणासह उपविजेतेपदासह दुसरे स्थान तर जपानने 113 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. भारताच्या रचनाने 43 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. रचनाने अंतिम लढतीत चीनच्या हुहांगचा 3-0 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या वजन गटातील रचना ही आशियाई विद्यमान चॅम्पियन आहे. 2025 साली व्हिएतनाममध्ये झालेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई चॅम्पियनशिप महिलांच्या कुस्ती स्पर्धेत रचनाने सुवर्णपदक मिळविले होते.
भारताची आश्विनी विष्णोईने 65 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. ती राजस्थानची रहिवासी असून तिने 17 वर्षांखालील आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा आशियाई बिच कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली आहेत. अॅथेंसमधील स्पर्धेत अंतिम लढतीत आश्विनीने उझ्बेकच्या रेकीमजोनोव्हाचा 3-0 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अॅथेंसमधील स्पर्धेत भारताच्या मोनीने 57 किलो वजन गटात रौप्य पदक मिळविले. या गटातील झालेल्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत कझाकस्थानच्या युसमेनोव्हाने मोनीचा 6-5 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केल्याने मोनीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या काजलने 73 किलो वजन गटात रौप्य पदक मिळविले. सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये चीनच्या क्वीयुने काजलचा 8-5 अशा गुणांनी पराभव केला. भारताला या स्पर्धेत तिसरे रौप्य पदक येशीताने मिळवून दिले. महिलांच्या 61 किलो वजन गटात अमेरिकेच्या फर्नांडीजने एशिताचा 11-0 असा एकतर्फी पराभव केला. महिलांच्या 49 किलो वजन गटात भारताच्या कोमल वर्माने कांस्यपदक मिळविले.









