वृत्तसंस्था / शिझुओका (जपान)
येथे झालेल्या जपान पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि कृष्णा नगर तसेच सुकांत कदम यांनी दर्जेदार कामगिरी करत 6 सुवर्णपदके मिळविली.
सदर स्पर्धेत पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरीत सुवर्णपदके पटकाविली तर टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील चॅम्पियन कृष्णा नागरने एकेरी आणि मिश्र दुहेरीत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. सुकांत कदमने पुरूष दुहेरीत सुवर्णपदक तसेच एकेरीत रौप्य पदक मिळविले.
पुरूष एकेरीत एसएल-3 विभागात भारताच्या प्रमोद भगतने जपानच्या फुजीहाराचा 17-21, 21-19, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हा सामना सुमारे दीड तास चालला होता. पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी आपल्याच देशाच्या जगदीश दिल्ली व नवीन शिवकुमार यांचा 21-17, 18-21, 21-16 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भगतने एसएल-4-एसयु-5 विभागात मिश्र दुहेरीचे विजेतेपद प्रमोद भगत व मनीषा रामदास यांनी आपल्याच देशाच्या नितीशकुमार व मुर्गुसेन यांचा 29 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. भारताच्या कृष्णा नागरने एकेरीत अमेरिकेच्या क्रेझीव्हेस्कीचा 22-20, 21-13 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत नागर आणि नित्याश्री यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले. सुकांत कदमने भगत समवेत पुरूषांच्या एसएल-3-एसएल-4 प्रकारात सुवर्णपदक तर एसएल-4 एकेरीत भगतने रौप्य पदक मिळविले. मनदीप कौर आणि निरज यांनी महिलांच्या एसएल-3 विभागात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. महिलांच्या एसएल-3 व एसयु-5 दुहेरीत भारताच्या मानसी जोशी आणि पी. मुर्गुसेन यांनी सुवर्णपदक तसेच निरज आरती व संजना कुमारीने कांस्यपदक, मानसी जोशी व ऋत्विक रघुपती याने मिश्रु दुहेरीत एसएल-3-एसयु-5 विभागात कांस्यपदके मिळविली. महिलांच्या एसयु-5 विभागात भारताच्या तुलसीमती, मनीषा रामदास आणि शांतीया यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके पटकाविली. रघुपतीने पुरूषांच्या एसयु-5 दुहेरीत हार्दिक मकरसमवेत रौप्य पदक, ऋत्विक रघुपतीने पुरूष दुहेरीच्या एसयु-5 विभागात रौप्य पदक, नित्याश्रीने महिला एकेरीच्या एसएच-6 प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.









