वृत्तसंस्था / युंग तेवू (व्हिएतनाम)
येथे झालेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई चॅम्पियनशिप महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला मल्लांनी दर्जेदार कामगिरी करत सांघिक जेतेपद मिळविताना सर्व म्हणजे 10 गटात पदकांची लयलुट केली. या स्पर्धेत भारतीय महिला मल्लांनी 4 सुवर्ण आणि 5 रौप्य व एक कांस्य पदक मिळविले.
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला मल्ल प्रियांशी प्रजापतने 50 किलो वजन गटात, रिनाने 55 किलो गटात, सृष्टीने 68 किलो गटात आणि प्रियाने 76 किलो गटात सुवर्णपदके मिळविली. भारताच्या आणखी पाच महिला मल्लांनी विविध गटात सुवर्णपदकाच्या फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 57 किलो गटात नेहा शर्मा, 59 किलो गटात तन्वी, 62 किलो गटात प्रगती, 65 किलो गटात शिक्षा तर 72 किलो गटात ज्योती बेरवाल यांनी रौप्य पदके पटकाविली. महिलांच्या 53 किलो वजन गटात हिनाबेन खलीफाने कांस्यपदक मिळविले.
ग्रीकोरोमन पुरुषांच्या कुस्ती प्रकारात भारताच्या सुमिने 63 किलो गटात सुवर्ण, 97 किलो गटात नितेश आणि 72 किलो गटात अंकित गुलीया यांनी प्रत्येकी 1 कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारताच्या व्हिक्कीने 97 किलो गटात सुवर्ण पदक मिळविले. तर निखिल, सुजित कालकल, जयदीप, चंद्रमोहन आणि सचिन यांनी सुवर्णपदकाच्या फेरीत प्रवेश केला आहे.









