शाळकरी मुलांसह पाच वाड्यांची गैरसोय
ओटवणे प्रतिनिधी
वेर्ले गावातील पाच वाड्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पुलाचा जोड रस्ता शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एका बाजूने खचून कोसळल्यामुळे या पाचही वाड्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. याचा फटका शाळकरी मुलांसह ग्रामस्थांना बसत आहे.
समतानगर, गावठणवाडी, जेंगाटवाडी, तळेवाडी, राणेवाडी या भागाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पुल होता. या पुलामुळेच या चारही वाड्या कमी अंतरात जोडल्या गेल्या होत्या. गिरण झालेला हा पूल नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होता. मात्र शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीत या पुलाचा जोड रस्ता एका बाजूने खचून कोसळला. शाळा, ग्रामदैवत पावणाई मंदिर कडे जाणारा हा सर्वात जवळचा मार्ग होता. त्यामुळे सध्या शाळकरी मुलांसह ग्रामस्थ व महिलांना दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून गावातील महत्त्वाच्या ठिकाणी जावे लागत आहे.बांधकाम व महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या पुलाच्या कोसळलेल्या जोड रस्त्याची तात्काळ तात्पुरती डागडुजी करावी आणि शाळकरी मुलांसह ग्रामस्थांचे होणारी गैरसोय दूर करावी. तसेच बांधकाम खात्याने तात्काळ हा पुल निर्लेखित करून या पुलाचा नवीन प्रस्ताव करावा अशी मागणी या गावातून होत आहे.









