रामनगर / वार्ताहर
जोयडा तालुक्यातील काटेली ग्रामपंचायत क्षेत्रातील केलोली येथील नव्यानेच बांधलेला पूल पहिल्याच पावसात कोसळला आहे. यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे.
गावात कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात नागरिकांना आपली वाहने घेऊन जाण्यासाठी मिळत नसल्याने केलोली येथील ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली होती. सदर गाव वन्यजीव संरक्षण क्षेत्रात असल्याने पूल बांधण्यासाठी वनविभागाचा आक्षेप होता परंतु गतवर्षी आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी जि. पं. फंडातून 15 लाख रुपये निधी मंजूर करून तात्पुरता पूल बांधण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात सदर पूल वाहून गेला आहे. या गावातील जयंत अर्जुन गावडा हा वृद्ध गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असता सदर पूल वाहून गेल्याने स्थानिकांनी त्याला पूल पार करून अन्य वाहनातून दवाखान्यात नेले. रुग्णाला घेऊन जाण्यासाठी आलेले वाहन मात्र पूल वाहून गेल्याने गावातच अडकले.









