वृत्तसंस्था/ हमीदपूर (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील हमीदपूर येथे एका विवाह समारंभात जेवणे होत असताना पतीने त्याला रोटी वाढण्यास उशीर झाल्यामुळे नवपरिणीत पत्नीला सोडून दिल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे, तर त्याने विवाह समारंभातून बाहेर पडून अन्य युवतीशी विवाहही केला. त्यामुळे वधूने पोलिसात तक्रार सादर केली आहे. या प्रकरणाची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
मेहताब नामक व्यक्तीचा एका युवतीशी विवाह होणार होता. 22 डिसेंबरला या विवाहाचा सभारंभ अतिशय उत्साहात सुरु झाला होता. वधूकडील लोकांनी वराकडून आलेल्या वरातीचे आणि नातेवाईकांचे स्वागत केले आणि त्यांच्यासाठी जेवण वाढले. तथापि, वरासमवेत आलेल्या एका व्यक्तीने जेवणात रोटी उशीरा वाढली म्हणून भांडण उकरुन काढले. वधूकडील लोकांनी वराच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, वराच्या लोकांनी विवाहस्थळ सोडले. त्यांनी वधूकडील मंडळींसंबंधी अपशब्द उच्चारुन त्यांना दोष दिला. नंतर या वराचे दुसऱ्या युवतीशी लग्न करण्यात आले. ही वार्ता वधूच्या लोकांना समजताच त्यांना मोठाच धक्का बसला. त्यांनी त्वरित पोलिसात तक्रार सादर केली आहे.
पोलिसांकडून तपास
या प्रकरणाचा पोलिसांनी त्वरित तपास सुरु केला आहे. वधूने आणि तिच्या पित्याने वराकडील पाच लोकांच्या विरोधात तक्रार सादर केली आहे. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप वधूच्या बाजूकडून करण्यात आला. लग्नासाठी वधूच्या बाजूने 7 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच दीड लाख रुपयाचा हुंडाही वराच्या घरी पोहचविण्यात आला आहे, असे वधूने सादर केलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची बरीच चर्चा सध्या होत आहे.









