पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन सरकार संकटात सापडले आहे. अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य सचिव साजिद जावेद या मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर तिथे अनेक घडामोडी घडल्या आहेत. विद्यमान शिक्षणमंत्री नाधिम झाहवाल यांच्याकडे अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर स्टीव्ह बर्कले यांच्याकडे आरोग्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनक आणि साजिद यांच्यानंतर बाल आणि कुटुंब मंत्री विल क्विन्स आणि संसदेच्या खासगी सचिव लॉरा ट्रॉट यांनीही बुधवारी राजीनामे दिले. एकंदर चार राजीनाम्यांमुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर खुर्ची सोडण्याचा दबावही वाढला आहे.
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी मंगळवारी उशिरा राजीनामा दिला. दोन्ही मंत्र्यांनी जॉन्सनच्या कार्यक्षमतेबद्दल आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सरकारने आपल्या संपूर्ण क्षमतेने काम करायला हवे ही लोकांची अपेक्षा अगदीच योग्य आहे. आपण त्यासाठी लढण्यासाठी आवश्यकता असल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशासमोर अनेक आव्हाने आहेत, असे ऋषी सुनक यांनी राजीनाम्याची घोषणा करताना स्पष्ट केले. तर, बोरिस जॉन्सन राष्ट्रीय हित डोळय़ासमोर ठेवून सरकार चालवण्यास असमर्थ असल्यामुळे आपण सरकारमध्ये राहू इच्छित नाही, असे साजिद जाविद यांनी सांगितले. अनेक खासदार आणि जनतेचा विश्वास जॉन्सन यांच्यावरून उडाला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टर्नर यांनीही आता बोरिस सरकार कोसळण्याच्या बेतात असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मागच्याच महिन्यात विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि पुढचे वर्षभर तरी त्यांच्या सरकारला धोका नाही. फक्त नियमात बदल झाला तर ही परिस्थिती बदलू शकते, असे म्हटले होते.
ऋषी सुनक नारायण मूर्तींचे जावई
कोरोनाच्या काळात पार्टी करणाऱया जॉन्सनना गेल्या महिन्यात अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास त्यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष पुढचा पंतप्रधान कोणाला करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शर्यतीत 6 नावे आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आघाडीवर असल्याचे मानले जाते. 40 वर्षीय ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारात ऋषी सुनक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जॉन्सन यांच्या प्रेस ब्रीफिंग्ज आणि टीव्ही डिबेटमध्येही अनेकवेळा त्यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती.
कबुली आली अंगलट
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला आहे. 2019 मध्ये क्रिस पिंचर यांना बोरिस सरकारमध्ये जबाबदाऱया देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची पूर्वकल्पना होती, अशी कबुली पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एका मुलाखतीत दिली आहे. ही एक खूप मोठी चूक होती, असेसुद्धा त्यांनी मान्य केले आहे. पण त्यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांमध्येच त्यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.









