रेल्वेस्थानक परिसरात जवानांची गर्दी
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान शुक्रवारी पुन्हा माघारी फिरले. यामुळे बेळगाव रेल्वेस्थानक परिसरात शुक्रवारी सायंकाळी जवानांची तुफान गर्दी झाली होती. हे जवान छत्तीसगड परिसरातून आल्याने रात्री जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन रेल्वेने रवाना झाले. विधानसभेच्या निवडणुका बुधवार दि. 10 रोजी पार पडल्या. एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्याने बाहेरच्या राज्यातील सीमा सुरक्षा जवान मागविण्यात आले होते. सीमा सुरक्षा दल, महाराष्ट्र पोलिसांचे होमगार्ड याचबरोबर इतर राज्यांचे पोलीस देखील निवडणूक कालावधीत दाखल झाले होते. प्रत्येक चेकपोस्टवर या जवानांची मागील महिन्याभरापासून नेमणूक करण्यात आली होती. सुरळीत पद्धतीने निवडणुका पार पडल्याने शुक्रवारी हे जवान आपापल्या गावी माघारी परतले. यामुळे शुक्रवारी सायंकाळी परिवहन मंडळाच्या बस, ट्रक यामधून शेकडो जवान रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाले. या जवानांनी आसपासच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. रात्री गोवा एक्स्प्रेसने जवान आपापल्या गावी परतले.









