‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न’ पुस्तकाचे प्रकाशन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्यावतीने संकलित करण्यात आलेल्या ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रोहित पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक करत सीमाप्रश्न लवकर सुटला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. आजच्या विद्यार्थी व युवकांपर्यंत सीमाप्रश्न पोहोचविण्यासाठी युवा समितीने संकलित केलेल्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. हे पुस्तक प्रत्येक मराठी भाषिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण तासगाव मतदारसंघातील प्रत्येक शाळेतील ग्रंथालयांमध्ये सदर पुस्तक पोहोचविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, यासाठीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पुस्तकाच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट केला. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभारही मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. कार्यक्रमाला मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, अमित देसाई, माजी महापौर सरिता पाटील, शिवानी पाटील, राजू बिर्जे, विजय भोसले, राकेश पलंगे, संजय शिंदे, किरण परब, उमेश पाटील, लक्ष्मण शिंदोळकर यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.









