कोल्हापूर :
रांगोळी (ता. हातकणंगले) येथील बेपत्ता ग्रामपंचायत सदस्य लखन आण्णाप्पा बेनाडे (वय 36) याचा तिच्या प्रियसीनेच पती व साथीदारांच्या मदतीने अपहरण करुन निर्घुण खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. लखन आण्णप्पा बेनाडे (वय 36 रा. रांगोळी ता. हातकणंगले) असे मृताचे नांव असून, त्याच्या शरिराचे तलवार, एडका, आणी चॉपरने सहा ते सात तुकडे करुन ते संकेश्वर येथील नदीमध्ये फेकल्याची कबूली आरोपींनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी गुह्यात वापरलेली हत्यारे आणी मोटार जप्त केली आहे.
विशाल बाबुराव घस्ते, आकाश उर्फ माया दिपक घस्ते (वय 21 रा. तामगांव ता. करवीर), संस्कार महादेव सावर्डे (वय 20 रा. देवर्डे ता. करवीर), अजित उदय चुडेकर (वय 29 रा. राजकपुर पुतळा, जुना वाशी नाका), लक्ष्मी विशाल घस्ते (वय 36रा. राजेंद्रनगर) या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. या बाबतची फिर्याद निता उमाजी तडाखे (वय 35 रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हा गुरुवार (10) जुलैपासून बेपत्ता होता. याचा तपास हुपरी व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते. यावेळी पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना लखन बेनाडे याचे लक्ष्मी घस्ते, विशाल घस्ते यांनी सायबर चौक येथून अपहरण केल्याची माहिती बुधवार (16 जुलै) रोजी मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथके तयार करुन या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी घस्ते हे उजळाईवाडी येथील एका वॉशिंग सेंटरवर मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून लखन बेनाडेबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी खूनाच्या गुह्याची कबूली दिली.
- बचतगटाच्या कर्जातून लखन व लक्ष्मीची ओळख
विशाल घस्ते व लक्ष्मी घस्ते यांचा विवाह झाला होता. यानंतर विशालवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये त्याला अटक होवून तो कारागृहात होता. याच दरम्यान लक्ष्मी घस्ते ही बचत गटाच्या कर्जासाठी ललखन बेनाडे यांच्या संपर्कात आली व या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. हे दोघही काही काळ इचलकरंजी परिसरात एकत्र राहत होते. मात्र कालांतराने या दोघांमध्ये खटके उडू लागले. याचवेळी विशाल घस्ते कारागृहातून बाहेर आला. याची माहिती मिळताच लक्ष्मी पुन्हा विशालसोबत येवून राहू लागली. याच रागातून लखनने लक्ष्मीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणी चोरीचे गुन्हे दाखल केले.
- त्रासाला कंटाळून खूनाचा निर्णय
लक्ष्मी व लखन एकत्र राहत असताना या दोघांमध्ये शरीर संबंध आले होते. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी लखन देत होता. याचसोबत लखनने लक्ष्मी व तिच्या मुलांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूकीचे गुन्हे दाखल केले होते. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी व विशाल यांनी लखनचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. विशालने याची माहिती त्याचे मित्र आकाश, संस्कार आणि अजित यांना दिली.
- मोटारीतून अपहरण
गुरुवार (10 जुलै) रोजी लखन बेनाडे हा शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये आला होता. सायंकाळी 5 वाजता लखनने लक्ष्मीला फोन करुन मी तुझ्या विरोधात असलेली तक्रार मागे घेतो मात्र तु माझ्या सोबत चल असे सांगितले. लक्ष्मी व विशाल शाहूपुरी परिसरात लखनला भेटले. यावेळी लखनने विशालला मारहाण करत निघून गेला. मात्र तो राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आला. याची माहिती लक्ष्मी व विशालला मिळाली. यावेळी त्यांनी लखनला ठार मारण्याचे नियोजन केले. यानुसार विशाल त्याची मोटार घेवून लक्ष्मी आकाश, संस्कार व अजित यांच्यासोबत सायबर चौकात थांबला होता. लखनचा पाठलाग सुरु केला. सायबर चौकापासून लखनचा पाठलाग केला शाहू टोलनाका परिसरात मोटारीतून त्याचे अपहरण करत थेट संकेश्वर परिसरात नेले.
- मृतदेहाचे सहा तुकडे
पाचही संशयीतांनी लखनला संकेश्वर (कर्नाटक) येथील नदीकडेला असलेल्या एका शेतामध्ये नेले. त्याच्यावर चॉपर, तलवार आणि एडक्याने सपासप वार करुन शरीराची चाळण केली. यानंतर या ठिकाणी तलवार आणि चॉपरच्या सहाय्याने मृतदेहाचे सहा तुकडे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी लखनच्या मृतदेहाचे डोके धडपासून वेगळे केले, तसेच दोनही हातपाय तोडून ते पोत्यात भरले. यानंतर हे पेते संकेश्वर येथील नदीमध्ये फेकून दिले. विशाल हा सराईत गुन्हेगार असुन, त्याच्यावर 20 गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा पुतण्या आकाशही सराईत असून तो कुमार गायकवाडच्या खूनामध्ये संशयीत आरोपी आहे. त्याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत.
- कोगनोळी टोलनाका चुकविला
पाचही संशयीतांनी खून पचविण्याचे पुरेपुर प्लॅनिंग केले होते. त्यांनी संकेश्वरला जाताना कोगनोळी टोलनाक्यावर जाणे टाळले. कोगनोळी गावातून थेट संकेश्वरला पोहोचले. यानंतर हे पाचही जण शुक्रवारी सकाळी कोल्हापूरात आले. उजळाईवाडी येथील आकाशच्या वॉशिंगसेंटरवर तवेरा मोटार धुवून ती स्वच्छ केली व राजेंद्रनगर येथे लपवून ठेवली. यानंतर पाचही जण आपआपल्या कामामध्ये व्यस्थ राहिले. संशयीतांनी लखनचा मोबाईल फोडून नदीतच फेकून दिला.
- पथकाचे अभिनंदन आणि बक्षीस
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजु कांबळे, संतोष बरगे, प्रदीप पाटील, विलास किरोळकर, अमित सर्जे, सायली कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी यांनी ही कारवाई केली. या पथकाचे पोलीस अधिक्षक योगशकुमार गुप्ता आणी अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी अभिनंदन करत बक्षीस जाहिर केले.








