ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपने ईडी, सीबीआयनंतर आता निवडणूक आयोगाला कच्छपी लावण्याचे काम केले, असा घणाघात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला.
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, भाजपने यापूर्वी ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांना कच्छपी लावले होते. आता निवडणूक आयोगालाही भाजपने कच्छपी लावले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निवडणूक आयोगाने काल निकाल देत बंडखोर शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. आयोगाचा हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मुळीच पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होतं, पण असं झालं नाही. ज्यावेळी तथ्यांच्या आधारावर कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यास आली होती. त्यावेळी शिंदे गटाकडून 4 लाख कागदपत्रे सादर करण्यात आली त्यावेळी आम्ही 22 लाख कागदपत्रे सादर केली होती.
अधिक वाचा : मला फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही
दरम्यान, जे लोक गेले आहेत, ते लोक मूळ शिवसेनेतून निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कि मेरिटवर निकाल लागला पाहिजे, तर मुळात शिंदे किंवा त्यांच्या साथीदारांनी मेरिट कधीच सिद्ध केलं आहे. सत्तांतरानंतर सुद्धा अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली, त्यात शिंदे गटाचा उमेदवार नव्हता. पाच विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक झाली त्यातही शिंदे गटाचा उमेदवार नव्हता. कसबा आणि चिंचवडमध्येदेखील शिंदे गटाचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे तुम्हाला मेरीट सिद्ध करायची संधी मिळालेली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की आम्ही मेरीट सिद्ध करतो, मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेत नाही? असा सवालदेखील यावेळी अंधारे यांनी उपस्थित केला आहे.