कॅन्टोन्मेंट-मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : लॉजरोडसह ठिकठिकाणी अडचण, पादचाऱ्यांना धोकादायक
बेळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने कॅन्टोन्मेंट हद्दीतील जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली. मात्र त्यानंतर रस्त्याशेजारी टाकण्यात आलेले लोखंडी स्ट्रक्चर हटविण्यात आले नाही. त्यामुळे लॉजरोडसह ठिकठिकाणी अडचण निर्माण झाली आहे. कॅन्टोन्मेंटनेदेखील याकडे कानाडोळा केल्याने वाहने आणि पादचाऱ्यांना सदर स्ट्रक्चर धोकादायक बनले आहे. शहरातील विविध चौक आणि मुख्य रस्ते होर्डिंगच्या विळख्यात सापडले होते. शहरातील धोकादायक होर्डिंग हटविण्याची सूचना यापूर्वी अनेकवेळा केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. महापालिका हद्दीतील चौकांमधील जाहिरात फलक हटविण्यात आले. पण रस्त्याशेजारील जाहिरात फलक जैसे थे होते. अलिकडेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्याशेजारी आणि चौकातील होर्डिंग हटविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार प्रारंभी महापालिका हद्दीतील होर्डिंग व बॅनर्स वगैरे हटविण्यात आले. कॅन्टोन्मेंटनेदेखील रस्त्याशेजारी लावण्यात आलेले व चौकातील होर्डिंग आणि स्ट्रक्चर हटविले होते. मात्र बंगलो परिसरातील होर्डिंग हटविण्याकडे दुर्लक्ष झाले होते. संरक्षण खात्याची परवानगी घेऊन आणि निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार बंगलो परिसरातील 23 फलक महापालिकेच्या पथकाने हटविले होते. तसेच या कारवाईवेळी होर्डिंगचे मोठमोठे स्ट्रक्चरदेखील गॅस कटरने कापून पाडले होते. बंगलो एरियातील स्ट्रक्चर बंगल्याच्या आतील भागात पडून आहेत. मात्र काहीठिकाणी जाहिरात फलकाचे स्ट्रक्चर रस्त्याशेजारी पडले आहेत. लॉजरोड कॉर्नरजवळ जाहिरात फलकाचे स्ट्रक्चर गेल्या आठ दिवसांपूर्वी काढले होते. पण लोखंडी स्ट्रक्चर हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. धर्मवीर संभाजी चौकाजवळ असलेल्या लॉज रोडवर लोखंडी स्ट्रक्चर पडून आहे. हा परिसर वर्दळीचा असून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. बाजारपेठेत ये-जा करणारे नागरिक या मार्गाचा अवलंब करीत असतात. पण येथील स्ट्रक्चर हटविण्याकडे महापालिका व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कानाडोळा केला आहे. याचा फटका वाहनधारक आणि पादचाऱ्यांना बसत आहे. तसेच गोगटे चौकातदेखील काही स्ट्रक्चर रस्त्यावर पडले असून, वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. जवळच बसथांबा असून नागरिकांना अडचण ठरत आहे. पडलेला स्ट्रक्चरचा भाग रात्रीच्यावेळी वाहनधारकांना दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने अनर्थ घडण्यापूर्वी येथील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर हटवावे, अशी मागणी होत आहे.









