भाजप प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांचे मत
पणजी : राज्यातील शेतजमिनी शेतकऱ्यांसाठी राखल्या जाव्यात या प्रामाणिक उद्देशाने सरकारने नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात कृषी जमीन विक्री प्रतिबंधक विधेयक मंजूर केले. सरकारचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. याला होणारा विरोध राजकीय आहे, असा आरोप भाजप प्रवत्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी केला. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य धाकु मडकईकर, सांतआंद्रे मंडळाचे सचिव झेवियर ग्रासियस यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकहितकारक निर्णय घेत आहे. मात्र त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असून त्याच नैराश्यातून ते या विधेयकास विरोध करत आहेत, अशी टीका वेर्णेकर यांनी केली. गोमंतकीय युवकांनी शेतीव्यवसायात लक्ष घालून आत्मनिर्भर व्हावे. त्याद्वारे ’स्वयंपूर्ण गोवा’ ही संकल्पना यशस्वी करण्यात मदत व्हावी या उद्देशानेच सरकारने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या कायद्यान्वये कोमुनिद जमिनी ताब्यात घेण्याचे किंवा फार्म हाऊस उभे राहावेत यासाठी कोणतीही तरतूद नाही. तसा सरकारचा उद्देशही नाही. तरीही काही लोक दिशाभूल करत आहेत. या कायद्याविषयी संभ्रम निर्माण करणारे लोक स्वत:च शेती जमिनीत फार्म हाऊस बांधून राहत आहेत. तर काहीजण शेत जमिनीच्या दलालीवर मोठे झाले आहेत. म्हणुनच ते या कायद्यास विरोध करत आहेत, असेही वेर्णेकर यांनी सांगितले. आज अनेक जमिनी बाहेरील लोकांनी विकत घेतल्या आहेत. यामुळे भात पिकाचे प्रमाण कमी होत आहे. त्या जमिनी सांभाळून ठेवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकाचे खरे तर स्वागतच व्हायला हवे होते. परंतु केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे, असे मत सिद्धेश नाईक यांनी व्यक्त केले. श्री. ग्रासियस यांनी बोलताना, आपण स्वत: शेतकरी असून राज्यातील शेत जमिनी कमी होत असल्याचे पाहून दु:ख होत असल्याचे ते म्हणाले. अशावेळी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे एक शेतकरी या नात्याने आपण स्वागत करतो, असे ते म्हणाले. श्री. मडकईकर यांनीही सदर निर्णयाचे स्वागत करताना लोकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.









