विविध प्रकारची अनोखी यंत्रसामग्री निर्माण करण्यात जर्मनी हा देश जगप्रसिद्ध आहे. विशेषत: अवजड आणि प्रचंड सामर्थ्याची यंत्रसामुग्री अमेरिका किंवा रशियापेक्षाही याच देशात अधिक प्रमाणात निर्माण होते. या देशाच्या उत्तर भागात पूर्वी एक प्रचंड नांगर निर्माण करण्यात आला होता. तो जगातील सर्वात मोठा नांगर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे वजन 30 हजार किलोग्रॅम इतके आहे.
जर्मनीच्या उत्तर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दलदलयुक्त भूमी आहे. या भूमीला पिकाऊ बनविण्यासाठी या नांगराचा उपयोग केला जात असे. या नांगराशी यंत्रशक्ती प्रचंड होती. काही सेकंदांमध्ये तो दोन मीटर खोलीचा ख•ा खोदत असे. दलदलयुक्त भूमीं सपाट करणे, तिच्यात नवी माती आणून घालणे, खोल जागी भर टाकून भूमी समतल करणे आदी कामांसाठी या नांगराची निर्मिती विशेषत्वाने करण्यात आली होती. या नांगरामुळे एम्सलँड जिल्ह्यातील हजारो एकर नापीक भूमी पिकाऊ करण्यात यश आले होते. इसवीसन 1700 पासून जी भूमी निकामी मानण्यात आली होती, ती या नांगरामुळे उपयोगयोग्य झाली आहे.
या नांगराची निर्मिती ओटो मेयर नामक इंजिनिअरने केली होती. त्याने दलदलीमुळे नापीक झालेल्या भूमीला उपयोगी बनविण्याचे आव्हान स्वीकारुन ही निर्मिती केली. साधारणपणे तीन दशके या नांगराने काम केले. त्यानंतर त्याला निवृत्त करण्यात आले आहे. तथापि, एखाद्या देशात राष्ट्रीय स्मारक असावे, तसे या नांगराचे महत्व जर्मनीत मानले जाते. या ‘निवृत्त’ नांगराला पाहण्यासाठी अनेक लोक येतात. हा नांगर जर्मनीच्या तंत्रवैज्ञानिक शक्तीचे मानचिन्ह मानला जातो.









