न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा आदेश
पणजी : ‘गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लि.’ या विद्युतवाहिनीच्या प्रकल्पासाठी उच्च दाबाचा टॉवर उभा करण्यासाठी खासगी जमिनीच्या संपादनास धारबांदोडा येथील रहिवाशांनी आव्हान दिलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. धारबांदोडा येथील होंडु विठ्ठल गावकर यांनी ‘गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लि.’ या कंपनीविऊद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तमनारच्या या प्रकल्पासाठी खासगी जमिनीत भव्य टॉवर उभारण्यावर याचिकादाराने आक्षेप घेतला होता. याप्रकरणी न्यायालयासमोर काल मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारच्यावतीने अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी बाजू मांडताना विवेक ब्रजेन्द्र सिंग विऊद्ध महाराष्ट्र सरकार यांच्यातील खटल्याचा दाखला दिला. भारतीय टेलेग्राफ कायदा-1885 च्या कलम -10नुसार जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावर 5 डिसेंबरला सुनावणी घेण्यात आली आहे. जर कंपनीच्या कामात कोणी अडथळा आणला असेल तर त्यावेळी टेलेग्राफ प्राधिकरणला त्यावर विचार करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. यापुढील सुनावणी आता 15 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून त्यावेळी याचिकादार या सुनावणीला हजर राहून गरज पडल्यास आपली हरकत मांडू शकत असल्याचे पांगम यांनी सांगितले. न्यायालयाने आधी न्याय दंडाधिकाऱ्यांनी सदर प्रश्नावर 15 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचा आणि तो कळवण्याचा निर्देश दिला. अन्य सर्व बाबीवर कोणताही निर्णय घेतला गेला नसून सर्व पक्षांना सगळे मार्ग खुले असल्याचा आदेश न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. महेश सोनक यांनी देऊन सदर याचिका फेटाळली.









