कासेगाव / संदीप डोंगरे :
शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र यादीमुळे तालुक्यातील अनेक गरीब बहिणींचे अनुदान रखडले आहे. सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक तंगीचा मोठा सामना करावा लागत आहे. शासनाच्या निकषानुसार एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्यास तिसऱ्या लाभार्थ्याला लाभ घेता येत नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र हा नियम अनेक ठिकाणी अडथळा ठरत आहे.
लाडकी बहीण’ योजना सुरु झाल्यानंतर वाळवा तालुक्यातून ऑनलाईन पोर्टलवरून ४५,३२२ अर्ज दाखल झाले, त्यापैकी ४५,११४ मंजूर तर २०८ नामंजूर करण्यात आले. मोबाईलवरून ७९,२४८ अर्ज दाखल झाले, त्यापैकी ७४,६१८ मंजूर तर ४,६३४ नामंजूर करण्यात आले होते. मजूर झालेल्या सर्वांना गेल्या वर्षभरापासून नियमित लाभभेटत आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून जवळपास पंधरा हजार बहिणींचे अनुदान न आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
योजनेअंतर्गत वय २१ ते ६५ वर्षांतील बहिणींची पडताळणी करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील अपात्र बहिणींची संख्या २,४९५ आहे. तसेच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी दाखविण्यात आल्याने पडताळणीस पात्र ठरलेल्या प्रकरणांची संख्या तब्बल १२,२५३ इतकी आहे. या संख्येतूनच मोठ्या प्रमाणात बहिणींचे अनुदान रखडले आहे.
एका कुटुंबात आई, मुलगी व सून असे तीन लाभार्थी असल्यास तिघींचे देखील अनुदान थांबविण्यात आले आहे. तर मुलगी लग्न होऊन परगावी गेल्यानंतर देखील माहेरच्याच रेशनकार्डवर नाव राहील्याने त्यांचेदेखील अनुदान थांबविण्यात आले आहे. काही कुटुंबे प्रत्यक्षात विभक्त राहत असून त्यांचे रेशनकार्डही वेगळे आहेत. मात्र ऑ नलाईन पोर्टलला नावे एकत्रित दिसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या चुकीच्या प्रक्रियेमुळे तालुक्यातील मोलमजुरी करून उपजीविका साधणाऱ्या गरीब व खरोखरच पात्र बहिणी नाराज झाल्या आहेत.
दरम्यान गणेशोत्सवासह काही दिवसांतच नवरात्री, दिवाळी असे मोठे सण येत असताना गरीब बहिणींना अनुदान न मिळाल्याने शासनाने निकषात तातडीने शिथिलता आणून पात्र बहिणींना न्याय द्यावा, अशी मागणी सर्वस्तरांतून होत आहे.
- गरजू बहिणींचे मानधन द्यावे
आमच्या घरी मी स्वतः, पती, मुलगा व मुलगी असे चारजण आहोत. आमचे कुटुंब मोलमजुरी करून पोट भरते. आमच्या रेशनकार्डमध्ये चौघांचेच नाव आहे. माझी मुलगी लहान आहे. तरीही मला एकटीला मिळणारे अनुदान गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. माझ्यासारख्या पात्र गरजू बहिणींचे मानधन मिळावे अशी कैफियत नेर्ले येथील एका लाडक्या बहिणींने मांडली आहे.
- फॉर्म भरणाऱ्यांनादेखील मानधन नाही
लाडकी बहिण योजना जाहीर करताना अंगणवाडी सेविका तसेच आपले सरकार केंद्र चालकांना भरलेल्या फॉर्मचे मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही सेविकांचा अपवाद वगळता मदतनीस व आपले सरकार केंद्र चालकांना एका वर्षानंतरही मानधन मिळालेले नाही.
-महादेव देसाई जिल्हा उपाध्यक्ष, महा ई सेवा संघटना
अपात्र यादीमुळे अनेक बहिणींचे अनुदान रखडले
एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी नियमाचा अडथळा
सणासुदीच्या काळात आर्थिक तंगीचा करावा लागतोय सामना
एका कुटुंबात आई, मुलगी व सून असे तीन लाभार्थी, तिघींचे अनुदान थांबवले.
निकषात शिथिलता आणून बहिणीं ना न्याय देण्याची सर्वस्तरांतून मागणी








