रत्नागिरी :
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सत्राला आज 16 जूनपासून सुरुवात होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत दणक्यात केले जाणार आहे. स्वागतासाठी लोकप्रतिनिधी शाळेला भेट देणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात 10 हजार 121 विद्यार्थी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार आहेत.
एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत वार्षिक परीक्षा घेऊन बहुतांश शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. काही शाळांना 1 मे रोजी निकाल लागल्यानंतर सुट्ट्या मिळाल्या होत्या. शिक्षण विभागाकडून आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार 16 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यापुस्तके, गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारीही करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जास्तीतजास्त बालकांचा प्रवेश कसा होईल, याबाबतही दक्षता घेतली जाणार आहे. त्यानिमित्ताने शाळा व परिसराची सजावट करण्यात आली आहे.
जिह्यात 2,814 अंगणवाड्या असून हजारो बालके यात आनंददायी शिक्षण घेतात. पहिलीच्या प्रवेशासाठी जी बालके पात्र आहेत, अशा बालकांनाही मोठ्या शाळेत प्रवेश घेण्याची उत्सुकता लागली आहे. जिह्यातील अंगणवाडी केंद्रात 5 ते 6 वर्षे वयोगटातील 10 हजार 546 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे यातील जवळपास 10 हजार बालकांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
पालकांचा दृष्टीकोन सकारात्मक करणे, बालकांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी शाळांना भेट देतील व विद्यार्थ्यांचे स्वागत करतील याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. शासन नियमानुसार पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असणे क्रमप्राप्त आहे. शालेय शिक्षण विभागाने 100 शाळांना भेट कार्यक्रम निश्चित केला आहे. 16 जून रोजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे अध्ययन, शालेय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, इतर सोयीसुविधा याबाबत आढावा घेणार आहेत.
- प्रवेशोत्सव बालकांची तालुकानिहाय आकडेवारी :
तालुका बालके
मंडणगड 400
दापोली 1,151
खेड 983
चिपळूण 1,231
गुहागर 739
संगमेश्वर 999
रत्नागिरी 1,660
लांजा 699
राजापूर 898
नगर पालिका 1,361
- विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यापुस्तकांसह बूट-मोजेही मिळणार
शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे जि. प. शाळांतील मुलांसाठी 6 लाख 78 हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. त्यांचे तालुकास्तरावर शाळांना वितरण करण्यात आले आहे. तर मेफत गणवेश, बूट व दोन जोड पायमोजे यासाठीही 66,289 लाभार्थी विद्यार्थ्यांना 1 कोटी 12 लाख 69,130 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.








