शहरात कोल्हा, तरस अन् बिबट्याची दहशत : वनखात्यासमोर रोखण्याचे आव्हान
बेळगाव : मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. विशेषत: शहरातील दाट वस्ती असलेल्या भागात अलीकडे बिबट्या, तरस, कोल्हा, हरीण, अजगर आदी प्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंताजनक ठरू लागला आहे. शिवाय या प्राण्यांना रोखण्याचे नवे आव्हानदेखील वनखात्यासमोर आहे. अनगोळ एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम मैदानावर मागील चार दिवसांपासून बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे उमटू लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील महिन्यात शास्त्राrनगर आणि शिवाजीनगरमध्ये कोल्हे आढळून आले होते. तर गतवर्षी रेसकोर्स परिसरात तब्बल महिनाभर बिबट्याने ठाण मांडले होते. शिवाय अधूनमधून शहरात वन्यप्राणी आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे हे वन्यप्राणी सैरभैर होऊन येत आहेत की दुसरे काही कारण आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, वन्यप्राण्यांचा वाढता वावर शहरवासियांची चिंता वाढविणारा आहे.
बेळगाव विभागातील खानापूर वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बिबटे, गवी रेडे, रानडुक्कर, हरीण, सांबर, चितळ, तरस, अस्वल आदींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या तुलनेत जंगल क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचेही दिसत आहे. वन्यप्राणी हे भक्ष्याच्या शोधात इतरत्र फिरू लागले आहेत. विशेषत: बिबट्या आणि तरस यांचे कुत्रा हा आवडते खाद्य आहे. दरम्यान, शहर परिसरात कचरा टाकलेल्या ठिकाणी कुत्र्यांचे कळप जमा होतात. त्यामुळे कुत्र्याला भक्ष्य बनविण्यासाठी बिबटे आणि तरस शहरात येऊ लागले आहेत. त्यामुळे एका वर्षात शहरात बिबट्या, तरस आणि कोल्ह्यांचे शहरवासियांना दर्शन झाले आहे. गतवर्षी ऑगस्ट दरम्यान एका गवंडी कामगारावर हल्ला करून बिबट्या रेसकोर्स परिसरात दडला होता. दरम्यान, शोधासाठी ट्रॅप कॅमेरे, श्वान, हत्ती आणि वनखात्याची सारी यंत्रणा तळ ठोकून होती. तब्बल एक महिना बिबट्याने चकवा देऊन रेसकोर्स परिसरात ठाण मांडले होते. अखेर वनखात्याच्या तावडीतून सहीसलामत सुटकाही करून घेतली होती. त्यानंतर येळ्ळूर येथे हरीण सापडले होते. तर सप्टेंबर महिन्यात शास्त्राrनगर आणि शिवाजीनगर परिसरात दोन कोल्हे आढळून आले होते. दरम्यान, या कोल्ह्यांची रवानगी भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात करण्यात आली होती.
शहरवासीय धास्तावले
चार दिवसांपासून अनगोळ परिसरात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे. अलीकडे सातत्याने वन्यप्राणी शहरात एंट्री करू लागल्याने शहरवासीय धास्तावले आहेत. विशेषत: शहराजवळ जंगल परिसर नसला तरी वन्यप्राणी शहरवासियांना दर्शन देऊ लागले आहेत. त्यामुळे काहींना कुतूहलही निर्माण झाले आहे.
भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैर
शहरात वन्यप्राणी येऊ शकतात. भक्ष्याच्या शोधात सैरभैर होऊन वन्यप्राणी इकडेतिकडे फिरत असतात. अलीकडे वनक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजीकच वन्यप्राण्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. चारा, पाणी आणि इतर भक्ष्याच्या शोधार्थ प्राणी फिरत असतात.
– शिवरुद्राप्पा कबाडगी (एसीएफ बेळगाव)









