कडोली येथील प्रकार, विद्यार्थ्यांमधून भीतीचे वातावरण, ग्राम पंचायत लक्ष देणार का?
वार्ताहर /कडोली
कडोली गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मात्र याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर आणि जीवाला घोर, अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान शाळेंच्या आवारात ही भटकी कुत्री फिरत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याबाबत गांभीर्याने ग्राम पंचायत घेत नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे. दरम्यान, कडोली येथील आमराईत मोठ्याप्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून भितीचे वातावरण पसरत आहे. आमराई येथे मराठी प्राथमिक शाळा, कन्नड व उर्दु प्राथमिक शाळा तसेच मराठी हायस्कूल आणि कन्नड हायस्कूल आहे. दररोज या ठिकाणी 1 हजारांहून अधिक विद्यार्थी शाळांना येत असतात. मात्र आमराई परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी बाहेर पडणेही कठीण बनले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नसबंदी करणे गरजेचे
मागील अनेक वर्षांपासून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असली तरी याकडे ग्राम पंचायतींने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सध्या 15 ते 20 भटक्या कुत्र्यांचा कळप फिरत आहे. असे अनेक कळप गावात विविध ठिकाणी फिरतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा धोका वाढत आहे. कुत्र्यांची नसबंदी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र कुत्र्यांची संख्या वाढत चालल्यामुळे समस्या जैसे थे राहत आहे. यापुढेही नसबंदी मोहीम राबविण्यासाठी ग्रा. पं.ने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्यावरुन चालत जाताना अचानक हल्ला करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. विद्यार्थ्यांना व वद्धांनाही या कुत्र्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









