कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयानंतर भाजप काहीशी बॅकफुटवर गेलेली आहे. काल माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खेड येथील गोळीबार मैदानातून अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यापासून ते थेट रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोप प्रत्यारोपाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 19 मार्चला त्याच मैदानात सभा घेऊन उत्तर देणार असल्याने कोकणात शिमग्यासाठी गेलेल्या चाकरमान्यांचे चांगले मनोरंजन होणार आहे, हे नक्की. राजकीय शिमग्याची सुरूवात कोकणातून काल झाल्याचे बघायला मिळाले. धर्माच्या नावावर मतांचे धुवीकरण करण्यासाठी काहीही करु शकतात. आता एमआयएमचे खासदार जलील छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात साखळी उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे औरंगजेबाची कबर औरंगाबादमध्ये नको म्हणून पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले जाते. या रंगपंचमीला हिरवा रंग की भगवा वापरायचा याचाच फतवा काढायचे आता राहिले आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. ती पण कोकणात कधी काळी शिवसेनेची मुलूख मैदान तोफ असलेल्या रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात. या सभेत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रामदास कदम हे 1990 पासून सलग 4 टर्म खेड (पूर्वीच्या) विधानसभा मतदार संघातून आमदार होते. युतीच्या काळात तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते पर्यावरण मंत्री होते. त्यांना दोनवेळा विधानपरिषदेची आमदारकी पण देण्यात आली होती. 2019 ला दापोली विधानसभा मतदार संघातून त्यांचा मुलगा योगेश याने राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांचा पराभव केला होता. 2019 साली राज्याचे लक्ष लागलेली ही विधानसभा निवडणूक होती. संजय कदम यांची ओळख ही दांडगा जनसंपर्क असलेले आणि आपला माणूस कामाचा माणूस अशी आहे. कधी काळी रामदास कदम यांचाच कार्यकर्ता असलेल्या कदमने 2014 साली राष्ट्रवादीच्यावतीने निवडणूक लढविताना सलग 25 वर्ष आमदार असलेल्या शिवसेनेच्या सुर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. त्यामुळे संजय कदम हे त्यावेळी जायंट किलर ठरले होते, आता संजय कदम हे उध्दव ठाकरेंसोबत गेल्याने नक्कीच रामदास कदम यांच्यासमोर आव्हान असणार आहे. ठाकरे यांच्या सभेने कोकणात राजकीय शिमग्याला सुरूवात झाली, त्याचे पडसाद थेट मुंबईत उमटत आहेत. रामदास कदम यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार करताना ठाकरे यांचे अनेक चेहरे असून त्यातील काही चेहऱयांचा आपण अनुभव घेतला असल्याची टीका केली. यापूर्वीही कदम यांनी ठाकरे यांच्यावर वैयक्तिक आरोप केल्यानंतर आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे आता रामदास कदम विरूध्द कोकणातील ठाकरे गटाचे नेते यांच्यात येत्या काळात जोरदार शिमगा बघायला मिळणार यात शंका नाही. रविवारच्या सभेत ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावरच बोलताना शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही तर माझ्या वडिलांनी केली असल्याचे बोलताना मोदी आणि शहा, सोमय्या यांचाही जोरदार समाचार घेतला. उध्दव ठाकरे यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते सभा घेतात जे बोलायचे ते बोलतात आणि मग सगळे कामाला लावतात, त्यांना जाब विचारण्याची जणू स्पर्धाच सगळ्य़ांमध्ये लागते. एकीकडे उध्दव ठाकरे कोकणात सभा घेत असताना तिकडे मुंबईत भाजपचे आशिष शेलार हे शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन आशीर्वाद यात्रा करत असतानाच तिकडे ठाकरे यांनी जो जो धनुष्यबाण घेऊन येईल तो चोर आहे, चोराला मतदान देणार का? सर्व गद्दारांना आव्हान करतो की चोरलेले धनुष्यबाण घेऊन या आणि मैदानात उतरा, माझ्याकडे मशाल आहे होऊन जाऊ द्या असे बोलताना सत्ताधाऱयांना आव्हान दिले. त्यामुळे ठाकरे विरूध्द भाजप शिंदे गट यांच्यात जोरदार शिमगा होणार यात शंका नाही. आता उद्यापासून चार दिवस सुट्टी असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होत असून संजय राऊत यांनी विधीमंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी सात दिवसांची मुदत विधानपरिषदेच्या सभापतींनी दिली होती मात्र अद्याप राऊत यांनी स्पष्टीकरण दिले नाहीच. उलट निवडणूक आयोगावर जोरदार टीका केल्याने राऊत यांच्याबाबत या आठवडय़ात सत्ताधारी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. गुरूवारी राज्याचा अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पात सरकार शेतकरी, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबतच कांद्याला अनुदान देण्याबाबत काय होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे








