आर्यना साबालेंकाने दुसऱ्यांदा पटकावले अमेरिकन ओपनचे जेतेपद : अमेरिकेच्या अनिसिमोव्हावर मात
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
महिला टेनिस जगतातील बेलारुसची दिग्गज खेळाडू आणि नंबर वन आर्यना साबालेंकाने वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या अनिसिमोव्हाचा 6-3, 7-6 (3) ने पराभव केला. सबालेंकाचे टेनिस कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम ठरले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षी विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये अनिसिमोव्हाने सबालेंकाला पराभवाचा दणका दिला होता. युएस ओपनमध्ये बेलारुसच्या सुंदरीने या पराभवाचा बदला घेत जेतेपदाला गवसणी घातली आहे.
रविवारी युएस ओपन स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. साबालेंका व अनिसिमोव्हा यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये खेळताना सबालेंकाला चांगलाच संघर्ष करावा लागला. अनिसिमोव्हाने तिला टक्कर दिली खरी पण पहिला सेट जिंकण्यात तिला अपयश आले. यांतर दुसऱ्या सेटमध्येही अनिसिमोव्हाने तिला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला शेवटी यश आले नाही. अखेरीस हा सामना साबालेंकाने 6-3, 7-6 असा जिंकत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावर खेळताना अनिसिमोव्हाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. याउलट साबालेंकाने आपल्या खेळावर फोकस केला व यशाला गवसणी घातली.
कारकिर्दीतील चौथे ग्रॅडस्लॅम जेतेपद
गत चॅम्पियन साबालेंकाने अमेरिकन ओपन स्पर्धेतील सलग दुसऱ्या जेतेपदासह कारकिर्दीतील चौथी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. याआधी 2023 आणि 2024 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा गाजवली होती. तसेच हा विजय सबालेंकासाठी अतिशय खास ठरला. या विजयासह तिने अनेक मोठे विक्रमही आपल्या नावे केले आहेत. ती ग्रँडस्लॅम मधील पहिली अशी महिला खेळाडू आहे जी हार्ड कोर्टवर खेळताना 4 ग्रँडस्लॅम जिंकू शकली आहे. या विक्रमात तिने जपानची नाओमी ओसाका आणि किम क्लस्टर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
साबालेंकाचा ग्रँडस्लॅममधील 100 वा विजय
27 वर्षीय साबालेंका ही केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे जी अंतिम सामना जिंकून ग्रँडस्लॅममध्ये 100 सामने जिंकली आहे. याआधी विम्बल्डनमध्ये इगा स्वायटेकने ग्रँडस्लॅममधील 100 सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय, 2012-14 मध्ये सेरेना विल्यम्सनंतर यूएस ओपनमध्ये सलग ट्रॉफी जिंकणारी ती पहिली महिला ठरली आहे.
विम्बल्डनच्या फायनलनंतर मी पूर्णपणे युएस ओपनवर फोकस केले होते. अर्थात, याचे फळ मला मिळाले आहे.
-आर्यना साबालेंका, बेलारुसची टेनिस क्वीन.









