शासकीय सुविधांपासून वंचित : दैनंदिन उदरनिर्वाहासाठी हमालांचा अजूनही संघर्षच
बेळगाव : दैनंदिन उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करणारे हमाल शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. विशेषत: एपीएमसी बाजारात 700 हून अधिक हमालांची नोंद आहे. या हमालांनी वेळोवेळी शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी मागणी केली आहे. मात्र मागील कित्येक वर्षांपासून हे हमाल सुविधांपासून उपेक्षित राहिले आहेत. हमाली करणाऱ्यांच्या मुलांसाठी दरमहा 200 रुपये अनुदान दिले जात होते. मात्र तेही आता बंद झाले आहे. त्यामुळे हमालांच्या मुलांचे शिक्षण खडतर बनू लागले आहे. एपीएमसीत वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. मात्र, तीही आता वितरणाअभावी तशीच पडून आहेत. एपीएमसी कायद्यातील दुरुस्तीनंतरही हमालांना दररोजच्या रोजीरोटीसाठी कसरत करावी लागत आहे. 10 वर्षांपूर्वी त्यांची 100 ते 150 रुपये कमाई होत होती. आता दैनंदिन 500 ते 600 रुपये कमाई होते. मात्र, वाढत्या महागाईमुळे गुजराण करणे त्यांना कठीण होऊ लागले आहे. काही हमाल वृद्ध झाले आहेत. मात्र, त्यांच्यासाठीदेखील शासनाकडून कोणतीच सुविधा मिळत नाही. त्यामुळे म्हातारपणी संघर्ष करत जीवन घालवावे लागत आहे. यासाठी वृद्ध हमालांना पेन्शन द्यावी, अशी मागणीही हमाल संघटनेकडून होऊ लागली आहे. आयुष्यभर पाठीवर ओझे वाहणारा मात्र उपेक्षित राहिल्याची खंत हमालांतून व्यक्त होत आहे.
संघर्ष करत उदरनिर्वाह…
धोका पत्करून दैनंदिन जीवनासाठी हमाली करावी लागते. मागील कित्येक वर्षांपासून एपीएमसी मार्केटमध्ये हमाली करतो. मात्र, शासनाकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे संघर्ष करत उदरनिर्वाह सुरू आहे. काही वेळेला काम मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत असतात.
-जोतिबा भडांगे, हमाल









