समुद्र खवळल्यानंतर दरवर्षीचा प्रकार
प्रतिनिधी /पणजी
वार्षिक पद्धतीप्रमाणे यंदाही पावसाळ्य़ाच्या अगोदर गोव्यातील विविध समुद्रकिनाऱयांवर काळ्य़ा रंगाच्या तेलगोळ्य़ांनी अस्वच्छता निर्माण केली आहे.
दरवर्षी साधारणतः मे महिन्यात गोव्यातील किनारे तेलगोळ्य़ांनी काळंवडले जातात. या संदर्भात एका शास्त्रज्ञाने सांगितले की, समुद्राला ज्या ज्या नद्यांमधून पाणी मिळते त्या पाण्यातून पेट्रोलियम पदार्थ शिवाय समुद्रातून अनेक जहाजे जाताना वाटेत डिझेल व अन्य पेट्रोलियम पदार्थांचे कण समुद्रात पडतात. शिवाय कैकवेळा जहाजातून तेलगळती सुरु होते आणि तेलाचे हे तवंग समुद्राच्या पाण्यावर राहतात.
समुद्र खवळल्याने येतात गोळे
एप्रिल अखेरपासून समुद्र खवळलेला राहतो. समुद्रात पडणारा केरकचरा या तेल तवंगाला जाऊन मिळतो आणि समुद्रातील लाटांमुळे हे दोन घटक एकत्र येतात. त्यातून हे काळ्य़ा रंगाचे गोळे जे पुन्हा पाण्यावर तरंगत असतात ते भरतीच्या वेळी किनाऱयावर येऊन पडतात. समुद्र खवळल्यानंतर वार्षिकच हे प्रकार होत असतात.
सध्या केरीपासून आगोंदपर्यंत सर्वत्र समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात हे काळ्य़ा रंगाचे तेलगोळे येऊन पडलेले आहेत. गोव्यातील बहुतांश समुद्रकिनारे हे तेलगोळ्य़ांनी व काळ्य़ा रंगाने काळवंडलेलेच दृष्टीस पडतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर समुद्रातील प्रदुषणाविरुद्ध कडक पावले उचलण्याची गरज आहे.









