विशेष अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्ष निवड ः शिवसेना-शिंदे सरकार आमने-सामने
प्रतिनिधी / मुंबई
शिवसेनेच्या शिंदे गटाने बंड केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतत्वाखालील अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने राजीनामा दिल्यानंतर स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखालील सरकारने विश्वास संपादन करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशाने आज रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत आहे. या अधिवेशनात प्रथम अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. मात्र अध्यक्ष निवडीत शिवसेनेच्या अस्तित्वाचीच लढाई होणार आहे. त्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दय़ांचा कस लागणार आहे.
एकनाथ शिंदेंची हकालपट्टी
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे गटाने आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतत्वाखालील शिवसेनेवर पक्षातील मंडळींनी विश्वास व्यक्त करून राष्ट्रीय कार्यकारिणीत तसा ठरावही मंजूर केला आहे. इतकेच नव्हे तर बंडखोरी करूनही सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढून न टाकता त्यांचे नेतेपद कायम ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवारी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दोन दिवस विशेष अधिवेशन
विश्वासदर्शक ठरावासाठी रविवार व सोमवार असे दोन दिवस विशेष अधिवेशन होणार आहे. अध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पक्ष सांगेल त्यालाच आमदारांनी मत द्यावे असा पक्षादेश काढला आहे. शिवसेनेतला शिंदे गट अजूनही आपण शिवसेनेत आहोत, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षादेश मानावा लागेल. जर पक्षादेश झुगारला तर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. एका बाजूला पक्षादेश झुगारून बंडखोर गटाच्या सहभागाने अध्यक्षांची निवडणूक झाली, तर नंतर बंडखोर गटाला अध्यक्ष मान्यता देतील. कदाचित संख्याबळानुसार शिवसेना म्हणूनही बंडखोर गटाला मान्यता देतील. मात्र शिवसेना त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकते. त्यामुळे अध्यक्षांच्या निवडीपेक्षा उद्याचा दिवस दावे प्रतिदावे यांनीच गाजणार आहे.
राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी लढत

काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. मागील दोन अधिवेशने अध्यक्षांविनाच झाली. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गडगडल्यानंतर भाजपच्या साहाय्याने सत्तेवर येणाऱया शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखालील सरकारने प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्यासारखा अनुभवी नेता मंत्रिमंडळात असावा यासाठी त्यांचे नाव चर्चेतून मागे आल्याचे सांगण्यात येते. तसेच शिंदेंच्या नेतफत्वाखालील शिवसेनेचा बंडखोर गट तांत्रिकदृष्टय़ा वादात सापडल्यास त्या जागेवर अनुभवापेक्षा कायद्याची जाण असलेली व्यक्ती असावी या विचाराने राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.









