धोकादायक बनलेले खड्डे बुजविण्याची नागरिकांतून मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी साचून धोकादायक बनलेले खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचा दृष्टीने नागरिकांनी गोवावेस येथील नवग्रह मंदिरासमोरील खड्डय़ात झाडाच्या फांद्या टाकल्या.
रस्त्यांची दुरवस्था झाली असून, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी 800 कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. तरी देखील शहरातील खड्डय़ांची संख्या कमी झाली नाही. काही ठिकाणी खड्डे जैसे थे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या खड्डेमय रस्त्याचा विकास कधी होणार असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे पावसामुळे आणखीनच मोठे बनले आहेत. परिणामी त्यामध्ये पावसाचे पाणी साचून रहात आहे.
पाणी साचल्याने खड्डय़ाचा अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. दररोज अपघाताच्या घटना घडूनही प्रशासनाने कानाडोळा केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोवावेस नवग्रह मंदिराजवळील रस्त्यावर भलामोठा खड्डा निर्माण झाला असून, खड्डय़ाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. महापालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी पाणी साचलेल्या खड्डय़ात झाडाची फांदी घातली आहे.
प्रशासनाचे डोळे आतातरी उघडणार का?
अशा प्रकारे नागरिकांनाच खबरदारी घ्यावी लागत असून, कोटय़वधी निधी खर्च करून रस्ते बनविलेल्या स्मार्ट सिटीची ही अवस्था आहे. एकीकडे काँक्रिटीकरण केलेले रस्ते आणि शेजारीच मोठे खड्डे त्यामुळे स्मार्ट सिटीचा विकास झाला कुठे असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्डय़ात झाडाच्या फांद्या घातल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे डोळे आतातरी उघडणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









