परूळे । प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या कालावधीत परुळेत ठिकठिकाणी लागलेल्या कोरजाईची वेदना या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे.या बॅनरच्या माध्यमातून बेकायदेशीर कोरजाई भागात कर्ली नदीत होणाऱ्या वाळू उपशावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून थेट महसूल यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेला जबाबदार धरण्यात आल्याचे मजकुरातून स्पष्ट जाणवत आहे .कोरजाईची वेदना… कोरजाईची नदी रडते, वाळू तिची लुटली जाते। मशिनांनी होड्या धावती, गावकऱ्यांची झोप हरपती ।।१।। तलाठी घेती लाचेचा हार, मंडळ अधिकारी करितात व्यवहार। पोलीसही नोटा मोजती, गावकऱ्यांची व्यथा कोण ऐकती।।२ असा मजकूर प्रसिद्ध करून परुळे बाजारपेठेमध्ये अज्ञात व्यक्तीने बॅनर लावल्याचे निदर्शनात येत आहे. या बॅनरच्या मजकुरावरून सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.आज सकाळी ११ वाजता अनंत चतुर्थी दिवशी निवती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हे बॅनर हटवले. सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या लोकप्रतिनिधींकडे मांडूनही आपल्या समस्यांना न्याय मिळत नसल्याने बॅनरच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी भावना व्यक्त होताना दिसत आहेत.









