कोल्हापूर / संतोष पाटील :
डॉ.कादंबरी बलकवडे, 2010 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी, मुळच्या पंजाबमधील जालंधर येथील असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र आणि नागालँड या दोन्ही राज्यांमध्ये प्रशासकीय सेवेचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रेरणादायी कारकीर्दीचा आढावा घेताना, त्यांच्या कार्यक्षम आणि पारदर्शी प्रशासनामुळे निर्माण झालेला ‘बलकवडे पॅटर्न‘ आज राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ. बलकवडे यांच्या कार्यशैलीला ‘बलकवडे पॅटर्न‘ असे संबोधले जाते.
सर्वसामान्य नागरिकांना सुसह्य आणि गतिमान प्रशासन देण्याचा त्यांचा दृष्टिकोन आज प्रशासकीय क्षेत्रात एक आदर्श ठरत आहे. त्यांच्या कार्यकुशलतेने आणि पारदर्शक कारभाराने त्यांनी प्रशासकीय सेवेत एक नवा मानदंड निर्माण केला आहे. डॉ. कादंबरी बलकवडे यांचे पती शैलेश बलकवडे हे आयपीएस असून ते सध्या अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मुंबई येथे सेवेत आहेत. बलकवडे दाम्पत्य हे प्रामाणिक आणि दमदार प्रशासकीय सेवेसाठी राज्यात प्रसिध्द आहेत.

- नागालँड ते महाराष्ट्र: सेवेचा प्रवास
डॉ. बलकवडे यांनी 2010-15 या कालावधीत नागालँडमधील नक्षलग्रस्त भागात सेवा देताना कठीण परिस्थितीतही आपली कार्यक्षमता सिद्ध केली. यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथे काम पाहिले, 2018 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान, निवडणूक आयोगाने अचानक गोंदिया जिल्हाधिकारीपदाचा पदभार सोपवला होता. निवडणुकीच्या गोंधळातही डॉ. बलकवडे यांनी अत्यंत पारदर्शक आणि कार्यक्षमपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. सध्या डॉ.बलकवडे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (मेडा) महासंचालक म्हणून कार्यरत असून, राज्याच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नवे आयाम प्रस्थापित करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मेडा हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.
15 डिसेंबर 1972 रोजी कोल्हापूर नगरपालिकेची महापालिका झाली. पहिले प्रशासक म्हणनू व्दारकानाथ कपूर यांनी 15 एप्रिल 1975 पर्यंत काम पाहिले. त्यांची कारकिर्द गाजली. कपूर यांनी केलेली ठोस कामे आणि आखलेला शहर विकासाचा आराखडा यामुळे आजही कोल्हापूरकर त्यांचे आदराने नाव घेतात. मार्च 1975 मध्ये शहरात अतिक्रमण काढण्यावरुन शहरातील तत्कालीन आमदारासोबत कपूर यांचा वाद झाला. या आमदार महोदयांच्या शिफारशीनंतर अचानक कोणतेही कारण न देता कपूर यांची तडकाफडकी बदली झाली. ज्या शहरासाठी अडीच–तीन वर्षे रात्रदिवस राबलो त्या शहरातून असे अवमानजनक जाणे कपूर यांना आवडले नाही. कोल्हापूरच्या कटू अनुभवाने त्यांनी ओलावलेल्या डोळ्यांनीच कोल्हापूर सोडले, यावरुन कोल्हापूर महापालिकेतील सेवा किती कठीण आहे, याची प्रचिती येते. डॉ.बलकवडे येथील लालफितीच्या आडाने काम करण्यात माहीर असलेल्या यंत्रणेकडून काम करुन घेत शहरवासीयांना दिलासा देण्यात यशस्वी झाल्या.
- कोरोनातील अजोड कामगिरी
डॉ. बलकवडे यांनी कोरोना संसर्गा वेळी प्रशासक काळात अवघ्या दोन अडीच कोटी रुपयांच्या निधीतून खर्च मर्यादित ठेवूनही महापालिका आणि खासगी दवाखान्यांत बेड तसेच ऑक्सिजनचा अखंड नियमित पुरवठा केला. शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू दिला नाही. सात ते आठ हजारांच्या अल्पदरात 80 हजारांहून रुग्णांना मनपाच्या दवाखान्यात आणि काsिव्हड सेंटर्सवर बरे झाले.
- कर न वाढता दीडशे कोटींचा जादा महसूल
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मागील दोन वर्षात शहरवासीयांवर एक रुपयांचा कर न वाढवता महापालिकेचे उत्पन्न दीडशे कोटी रुपयांनी वाढवण्याची किमया केली. यानिमित्ताने कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर वसूली, पीएम स्वनिधी व इतर उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेबद्दल हा गौरव झाला होता. शासनाच्या विविध योजनेअंतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेचा राज्य शासनाच्यावतीने गौरव केला.
- महापुरात घेतली काळजी
2021 च्या महापुरात अनेक ठिकाणी 15 दिवस पाणी पुरवठा खंडीत झाला. हायवे बंद झाल्याने टँकरची संख्याही अपुरी होती. या अनुभवावरुन 2019 ला नियोजन केल्याने तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला. टँकरचे समान वाटप झाले. पुरबाधित क्षेत्रातील स्वच्छता, नागरिकांचे स्थलांतर, आरोग्य, पाणी पुरवठा, घरगुती गॅस, इंधन सेवेचे मे 2021 मध्येच महापुरापूर्वीच नियोजन केले होते.
- राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या महासंचालक (महाराष्ट्र इनर्जी डेव्हलपमेन्ट अॅथॉरिटी) डॉ. कादंबरी बलकवडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 15 डिसेंबर 2023 रोजी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या वर्ष 2023 साठी राज्य ऊर्जा कार्यक्षमता कार्यप्रदर्शन पुरस्कार (गट एक) क्षेत्रातील ऊर्जा संवर्धनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आला. राज्याने ऊर्जा संवर्धनात केलेल्या कामगिरीचे कौतुक करून, महाराष्ट्राला भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने पुरस्कृत केले, हा मानाचा पुरस्कार कादंबरी बलकवडे यांच्या सुक्ष्म आणि पारदर्शी नियोजनामुळेच मिळाला.
- 100 दिवसांच्या उपक्रमातही अग्रभागी
मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबदद्दल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालिका डॉ कादंबरी बलकवडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.








