‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजचा ट्रेलर अॅक्शन, ड्रामा, इमोशनने भरपूर आहे. यात एका सामान्य युवकाची हीरो होण्याची कहाणी, स्ट्रगल अत्यंत फिल्मी शैलीत दाखविण्यात आली आहे. तसेच सीरिजमध्ये बॉलिवूडचा प्रत्येक दिग्गज कलाकार, सेलिब्रिटीची झलक दिसून येते. शाहरुख, आमिर खान स्वत:च्याच व्यक्तिरेखेत दिसून येतात, तर मुख्य भूमिकेत लक्ष्य स्वत:ची छाप पाडण्यास यशस्वी ठरला आहे. आसमान नावाच्या युवकाची यात कहाणी असून तो बॉलिवूडचा हीरो होण्यापर्यंतचा प्रवास गाठतो, या प्रवासात तो बॉलिवूड, येथील लोक आणि राजकारणाला सामोरा जातो. आसमानच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांना बॉलिवूडमधील रहस्य, कहाण्यांचीही झलक दिसून येणार आहे.
सीरिजची कहाणी बॉलिवूडच्या अवतीभवती घुटमळणारी असल्याने यात अनेक कलाकार दिसून येतात. आमिर, शाहरुखसोबत करण जौहरही ट्रेलरमध्ये दिसून आला आहे. आर्यन खानच्या दिग्दर्शनातील ही सीरिज असून यात लक्ष्यने मुख्य भूमिका साकारली आहे. तर यात बॉबी देओल नकारात्मक छटा असलेल्या भूमिकेत आहे. सीरिजमध्ये मोना सिंह, राघव जुयाल, गौतमी कपूर, मनोज पाहवा हे कलाकारही आहेत. द बॅड्स ऑफ बॉलिवूड सीरिजची निर्मिती गौरी खानने केली आहे. ही सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाली आहे.









