कणबर्गी येथील मातेकडून निर्दयी कृत्य : पहिल्या मुलाच्या वाढदिनीच दुसऱ्याचा बळी देण्याचा प्रयत्न
बेळगाव : पहिल्या मुलाच्या वाढदिवसादिवशीच दुसऱ्या दोन महिन्यांच्या मुलाला तलावात फेकून जन्मदात्या आईनेच त्याला संपविण्याचा प्रयत्न केला. रविवारी दुपारी कणबर्गी तलावात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली असून माळमारुती पोलिसांनी कणबर्गी येथील एका महिलेला अटक केली आहे. शांता रॉबर्ट करविनकोप्पी (वय 35) रा. कणबर्गी असे त्या महिलेचे नाव आहे. तिला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी शांतावर अटकेची कारवाई पूर्ण करून तिला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी कणबर्गी येथील रॉबर्टशी शांताचे लग्न झाले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. रविवार दि. 15 डिसेंबर रोजी पहिल्या मुलाचा वाढदिवस होता. दोन महिन्यांपूर्वीच शांताने आणखी एका मुलाला जन्म दिला. जन्मत:च तो फिट्सने त्रस्त होता. त्याच्यावर औषधोपचारही सुरू होते.
शांताचे माहेर बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील आहे. मुधोळ व बेळगाव या दोन्ही ठिकाणी दोन महिन्यांच्या बाळावर उपचार करण्यात येत होते. रविवारी दुपारी शांताचा पती रॉबर्ट कामावर गेला होता. दीर प्रार्थनेसाठी चर्चला गेला होता. सासरे शेतात गेले होते. सासू घरी होती. त्यावेळी दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन शांता थेट तलावाच्या काठावर पोहोचली. कोणी बघतात न बघतात तोच शांताने त्या बाळाला तलावात फेकले. त्यानंतर ती तेथून पळू लागली. हा प्रकार काही स्थानिक नागरिकांनी पाहिला. काही गुराखी व स्थानिक नागरिकांनी तलावात उडी टाकून त्या बाळाला वाचविले. तर आणखी काही जणांनी पाठलाग करून शांताला पकडून तिच्या हाती तिचे बाळ ठेवले. त्यानंतर माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी तलावातून बाहेर काढण्यात आलेल्या बाळाला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. नागरिकांनी शांताकडून माहिती घेऊन तिच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेतले.
बाळ आजाराने त्रस्त असल्याने तलावात टाकल्याची दिली कबुली
दोन महिन्यांपूर्वी जन्माला आलेले बाळ आजाराने त्रस्त होते. त्यामुळे आपण त्याला तलावात टाकण्याचा निर्णय घेतल्याची कबुली शांताने पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. जनावरे धुण्यासाठी गेलेल्या काही जणांनी तातडीने तलावात उडी टाकून त्या बाळाला वाचविले आहे. जर तलावावर कोणी नसताना शांताने बाळाला टाकले असते तर बाळ बचावले नसते. पहिल्या मुलाच्या वाढदिवसादिवशीच दुसऱ्या मुलाला तलावात टाकून त्याला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शांताची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आठवड्याभरातील दुसरी घटना
10 डिसेंबर रोजी बैलहोंगल येथील बीबीजान सद्दामहुसेन सय्यद (वय 35) या महिलेने नवजात शिशुला सिव्हिल हॉस्पिटलमध्येच सोडून तेथून पलायन केले होते. त्याच दिवशी रात्री उशिरा या नवजात शिशुचा मृत्यू झाला होता. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती. पोलिसांनी बीबीजानला अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच रविवारी आणखी एका महिलेने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला तलावात टाकून त्याला संपविण्याचा प्रयत्न केला आहे.









