विशेष वाहनाची व्यवस्था : रोजगार हमी योजनेची 57 ग्रामपंचायतींना देणार माहिती : ता. पं.-जि. पं.चा पुढाकार
बेळगाव : अकुशल कामगारांना आधार ठरणाऱ्या रोजगार हमी योजनेबाबत आता ग्राम पंचायत स्तरावर जागृती केली जाणार आहे. यासाठी तालुक्यातील 57 ग्राम पंचायतींना जागृती वाहनाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. जिल्हा आणि तालुका पंचायतच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात 7 लाखांहून अधिक रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्डची संख्या आहे. यंदा पावसाअभावी कामाची मागणी वाढली आहे. मात्र अद्यापही रोजगार हमीबाबत म्हणावी तशी जागृती नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांना या योजनेपासून देखील वंचित रहावे लागत आहे. यासाठी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला वाहनाच्या माध्यमातून भेट देवून जागृती केली जाणार आहे.
प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक
रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. मात्र काही ग्राम पंचायतींकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. काही मोजके दिवस काम देवून कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार केले जातात. या योजनेविषयी कामगारांना संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनेचा उद्देश सफल व्हावा यासाठी ग्रा. पं. पातळीवर रोहयोचा विस्तार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
प्रत्येक ग्राम पंचायतीला भेट देऊन जागृती करणार
तालुक्यातील 57 ग्राम पंचायतींना रोजगार हमीबाबत जागृती करण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला भेट देवून या वाहनाच्या माध्यमातून जागृती होणार आहे. शुक्रवारी या मोहिमेला चालना देण्यात आली आहे..
– ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर









