नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्हय़ात मोल्यवान धातू लिथियमचे मोठे भांडार सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा शोध लागल्याची घोषणा करण्यात आली होती. आता जम्मू-काश्मीर प्रशासनाने लिथियमच्या या भांडाराचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 59 लाख टन इतके लिथियम येथे सापडले असून त्याची किंमत अब्जावधीं रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या वर्षाच्या अखेरीस हा लिलाव होणे शक्य आहे, अशी घोषणा मंगळवारी एका कार्यक्रमात खाण विभागाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी केली. या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी सूचना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर प्रशासनाला केली आहे. यासाठी तज्ञांशी विचारविमर्श केला जाणार आहे. तसेच इच्छुक संस्थांशीही चर्चा केली जाणार आहे. लवकरच संसदेत या विषयावर चर्चा केली जाणार असून केंद्र सरकार संसदेत तसा प्रस्ताव सादर करेल. संसदेची मान्यता घेऊनच पुढची पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. लिथियमचा शोध कसा लागला, याचीहीं माहिती त्यांनी दिली.
भाग्य बलवत्तर म्हणून…
वास्तविक भारतीय खाण विभाग जम्मू-काश्मीरमध्ये चुन्याच्या दगडांचा शोध घेत होता. हे दगड येथे मोठय़ा प्रमाणात सापडतात. हा शोध घेत असतानाच तेथे चुन्याचा दगड, बॉक्साईट (ऍल्युमिनियमचे खनीज) आणि लिथियम हे एकत्रच सापडले. लिथियमच्या संदर्भात आम्ही भाग्यशाली ठरलो. तेथे हा मौल्यवान धातू सापडेल अशी शाश्वती नव्हती, असे प्रतिपादन भारद्वाज यांनी केले. आता या साठय़ाच्या संरक्षणाची योग्य व्यवस्था करण्यात आली असून या साठय़ाचा उपयोग देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी करण्याची व्यापक योजना सज्ज करण्यात आली आहे. शुद्ध स्वरुपातील लिथियम निर्माण करण्यासाठीही सरकारला यंत्रणा उभी करावी लागणार आहे. खासगी क्षेत्रालाही या प्रक्रियेत समाविष्ट होण्याची संधी आहे.
लिथियम काय आहे ?
लिथियम हा एक दुर्मिळ धातू (रेअर अर्थ मेटल) असून त्याचा उपयोग अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वीजेवर चालणाऱया वाहनांच्या बॅटऱया, मोबाईलच्या बॅटऱया आदी अत्यंत महत्वाची साधने निर्माण करण्यासाठी केला जातो. सध्या चीनकडे या धातूची मक्तेदारी आहे. भारतात आता हा धातू सापडू लागला असून तो भारताच्या संपत्तीत मोलाची भर घालणार आहे. आधुनिक बॅटऱयांची निर्मिती प्रामुख्याने याच धातूवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद सरकारने या तसेच या प्रकारातील इतर धातूंचा शोध घेण्यासाठी व्यापक अभियान हाती घेतले आहे. अन्य राज्यांमध्येही लिथियम सापडण्याची शक्यता आहे.









