पुणे / प्रतिनिधी
विविध खेळांना व्यावसायिकता प्राप्त झाल्यामुळे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे, असे मत अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.
त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. नवरात्र तसेच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विविध खेळातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आर्यनमॅन ऋतुजा उडपीकर, फिटनेस प्रभावक सोनाली तळावलीकर यांचीही मुलाखत घेण्यात आली.
भागवत म्हणाल्या, आमच्यावेळी शिक्षणालाच सर्वात जास्त प्राधान्य मिळायचे, अभ्यासातून जर वेळ मिळाला तरच खेळ किंवा इतर छंद जोपासता येत होते. मात्र आता तसं होत नाही, पालक अधिक जागृत झाले असून, खेळ किंवा छंद शिक्षणाचाच भाग असल्याचे ते मानतात. तसेच केंद्र आणि राज्य शासनाने उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे खेळांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला सुऊवात झाली आहे.









