ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांच्यासह ग्रामस्थांचा निर्णय
ओटवणे । प्रतिनिधी
बुधवारी झालेल्या चराठे ग्रामसभेत गोंधळ होऊन सरपंच प्रचिती कुबल यांच्या पतीने दादागिरी करत ग्रामसभा बंद पाडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केला असुन सरपंचांसह ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अमित परब यांनी सांगितले.याबाबत अमित परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक गोंधळ सुरू झाला. त्यावेळी सरपंचांच्या पतीने सभेमध्ये हस्तक्षेप करत दादागिरी केली आणि सभा बंद पाडली. या प्रकारामुळे सभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवक विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत नसल्याबाबत तक्रारी मांडल्या. त्यामुळे गावातील विकासकामांवर परिणाम होत असून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जाधव, माजी पंचायत समिती सदस्य विश्राम कांबळे, शरद जाधव, विशाल कांबळे, श्रद्धा जाधव, स्वप्नील जाधव, दर्शन धुरी, महेश मसुरकर, तेजस चराठकर, विष्णू परब, दादू मसुरकर, मीनाक्षी जाधव, सुनिल परब, सदा परब, ज्योती जाधव, मिलिंद उपरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब उपस्थित आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









