Rajaram Election : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. आमदार सतेज पाटील गट आणि माजी आमदार अमल महाडिक गट यांच्यामधील टोकाची इर्ष्य़ा, आरोप- प्रत्यारोप गेले महिनाभर कोल्हापूरकर अनुभवतायत. दोन्ही गटाकडून जाहीर सभेत राजकिय चिखलफेकही झाली. या प्रचाराच्या धुरळ्यात मात्र सामान्य़ मतदाराला व्यक्त होण्य़ास फक्त मतपेटीचा आधार असतो. मतपेटीत चिट्या टाकून आपल्या भावना व्यक्त करण्यात कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येतो. राजारामच्य़ा निवडणूकीतही कोल्हापूरकरांनी मात्र आपल्या शेलक्य़ा भाषेत नेत्यांचा समाचार घेतला आहे.
मतदारांनी नेत्यांच्या कानपिचक्या घेताना राजकारणाची पातळी खालवल्याची जाणिव करून दिली आहे. तसेच राजकारण करा पण कारखाना व्यवस्थित चालवा अशी आशाही व्यक्त केली आहे.
कारखान्याच्या एका माजी चेअरमनसाहेबांना एका मतदाराने खास संदेश देऊन आपल्या दलबदलूपणाने आपली राजकीय अवस्था खुप वाईट होणार असल्याचे भविष्य सांगितले आहे. दुसऱ्या एका मतदारांने चेअरमनसाहेबांना यांना लक्ष करताना निष्ठा जपण्याचे सांगून अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही असाही इशारा दिला. “तुमची अवस्था बाच्या बा गेला आणि बोंबलताना हात गेला.” असे कोल्हापूरी भाषेत मतदाराने फटकारले आहे.
एका लग्नाळू मतदाराने तर कहरच केला आहे. आपले लग्न ठरत नसल्याने मला कारखान्यावर नोकरीला ठेऊन कायम करावे त्यामुळे लग्न जुळेल अशी आस नेत्यांकडे धरली आहे.
एका जागरूक सभासदाने या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये होणाऱ्य़ा वरेमाप खर्चावर विचारपूस करून हा सत्तेवर आल्यानंतर हा खर्च कोठून वसूल केला जाणार आहे याची विचारणा केली आहे.









